कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

By admin | Published: December 14, 2014 12:06 AM2014-12-14T00:06:12+5:302014-12-14T00:06:12+5:30

खाडीभागातील दुर्दैवी घटना : पितापुत्राच्या मृत्यूने सारेच हळहळले...

He struggled with cancer, went to 'Father'! | कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

Next

एजाज पटेल, फुणगूस : मुलाच्या सतत आजारपणाचा धसका घेत वडिलांनी देह ठेवला अन् वडिलांच्या मृत्यूचे ओेझे मनावर घेत दुर्धर आजाराने पीडित असलेल्या त्या मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड महिन्यात प्राण सोडले. फुणगूस खाडीभागात झालेल्या या घटनेने अवघा खाडीभाग शोकसागरात बुडाला असून, येथील नवजीवन विद्यालयाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करत आपल्या या विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण केली.
‘किस्मत के खेल है ये मेरे भैय्या’ हे सत्य ठरलंय संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावात..! येथील विजय देवळेकर हे अत्यंत गरिबीत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. पत्नी, दोन मुली आणि गोंडस असा वैभव असे छोटेसे कुटुंब. मात्र घरात अठरा विश्व दारिद्र्य असतानाच नियतीने या कुटुंबाला पहिला धक्का दिला. शालेय शिक्षण घेत असलेल्या वैभवला आजाराने घेरले. सुरुवातीला हलका असणारा ताप वाढत गेला. उपचाराकरिता मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागली. अखेर वैभवला कॅन्सरसारखा दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचे वडील हादररुनच गेले.
आधीच गरीबी आणि त्यामध्ये एकच मुलगा. वैभवला कॅन्सरसारखा आजार पाहून साहजिकच वडील विजय देवळेकरांना प्रचंड धक्का बसला. वैभवचे आजारपण त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेले. अशातही मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी वैभववर उपचार सुरु ठेवले. दुसऱ्या बाजूला वैभव नवजीवन विद्यालय फुणगूस येथे शिक्षणही घेत होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत तो शिक्षणावर प्रेम करत होता. अशावेळी नियतीने दुसरा घाला घातला. मुलाच्या आजाराचा धसका घेतलेले विजय देवळेकर दीड महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेत निघून गेले. देवळेकर कुटुंबावर जणू आभाळ कोसळले.
वडिलांच्या मृत्यूने कॅन्सर पीडित वैभव पुरता खचला. मात्र आपल्यावरची जबाबदारी ओळखून न डगमगता धैर्याने उभा राहिला. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत छोटीमोठी कामे तो करत असे आणि ११ वाजता शाळेत जात असे. परत सायंकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा बाजारपेठेत व्यावसायिकांना मदत करुन अंधार पडताच घरी जात असे. बाजारपेठेत तो सर्वांचाच लाडका बनला होता. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला कॅन्सरसारखा भयानक आजार आहे, हे मुळीच पटत नव्हते इतकी कडवी झुंज तो कॅन्सरशी देत होता.
वडिलांच्या मृत्यूचे ओझे घेऊन कॅन्सरसारख्या भयानक आजाराला वैभव देत असलेली झुंज नियतीला पाहवली नाही आणि शुक्रवारी सायंकाळी नियतीने थेट वैभववरच घाला घातला.
वैभवची कॅन्सरशी असलेली झुंज अपयशी ठरली. वैभव आणि यमदुताच्या या लढाईत यमदूताचा विजय झाला असला तरी खऱ्या अर्थाने या गोंडस मुलाने दिलेली झुंज पाहता खऱ्या अर्थाने वैभवने यमावर मात केली असेच म्हणावे लागेल.
वैभवच्या मृत्यूचे वृत्त खाडीभागात समजताच अवघ्या खाडीभागावर शोककळा पसरली. ज्या नवजीवन विद्यालयात तो शिक्षण घेत होता, त्या शाळेला आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नवजीवन विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच फुणगूस बाजारपेठेतील व्यापारी यांच्यासह शेकडोजण वैभवच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. साऱ्यांनी वैभवला जड अंतकरणाने निरोप दिला. (वार्ताहर)
 

Web Title: He struggled with cancer, went to 'Father'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.