गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणूनच बंगला पाडण्यास सांगितले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:09+5:302021-08-24T04:36:09+5:30
- दापाेलीतील जमीनदाेस्त बंगल्याची पाहणी लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणून ...
- दापाेलीतील जमीनदाेस्त बंगल्याची पाहणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता म्हणून मिलिंद नार्वेकर यांना स्वतः बंगला पाडायला सांगितल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साेमवारी दापाेली येथे केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा तालुक्यातील मुरुड येथील बंगला रविवारी जमीनदाेस्त करण्यात आला. जमीनदाेस्त झालेल्या बंगल्याची साेमवारी (दि. २३) भाजप नेते किरीट साेमय्या यांनी पाहणी केली. सुमारे १५ मिनिटे ते या बंगल्याच्या बाहेर उभे हाेते. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
हा बंगला बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस येण्याआधीच हा बंगला तोडला; परंतु, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची आपण तक्रार केली होती, त्यामुळेच हा बंगला तोडण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाबत किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पडला आहे. आता पालकमंत्री अनिल परब यांचे रिसाॅर्ट मुख्यमंत्री केव्हा पाडणार, असा प्रश्न किरीट साेमय्या यांनी केला आहे.
—————————
वैभव नाईक यांना आव्हान
शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याचासुद्धा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला. वैभव नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांना हरित लवादामध्ये खटला दाखल करावा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला दिला आहे.