आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत
By Admin | Published: December 24, 2014 10:10 PM2014-12-24T22:10:04+5:302014-12-25T00:15:50+5:30
फुणगूसची कथा : निकृष्ट बांधकामामुळे अख्ख्या कुटुंबांवरच टांगती तलवार...
फुणगूस : फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थानाची इमारत मृत्यूचा सापळा बनली आहे. खिळखिळ्या बनलेल्या निवासस्थान इमारतीत येथील कर्मचारीवर्ग स्वत:च्या कुटुंबासह येणारा प्रत्येक दिवस अक्षरश: जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तसेच आरोग्य केंद्रात सेवा देणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या वास्तव्यासाठी अन्य स्वतंत्र इमारत अशा दोन इमारती येथे आहेत. दोन्ही इमारती सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या पुरातन आहेत. इमारतींची अतिशय दुर्दशा झाली असून, भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत.
स्लॅबचा भागही निखळून पडू लागला आहे. स्लॅबमधील लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. पावसाळ्यात स्लॅबमधून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब पूर्णपणे तुटून पडला होता. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली आहे. त्यानंतरही प्रशासन जागे झालेले नाही.
या खिळखिळ्या इमारतीत येथील कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:च्या कुटुंबासह येणारा प्रत्येक दिवस जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. या इमारतींची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, वातानुकुलीत खोलीत आरामदायी खुर्च्यांवर बसणाऱ्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानी ही व्यथा जाऊनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरत आहे. (वार्ताहर)
जीर्ण इमारत
कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या वास्तव्यासाठी अन्य इमारत अशा दोन इमारती.
दोन्ही इमारती सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या पुरातन.
इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब पूर्णपणे तुटून पडल्याने कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत.
दोन्ही इमारतींच्या छपराची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. ही इमारत पडण्याच्या स्थितीत असताना त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सक्ती करणे कितपत योग्य? असा सवाल होत आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहाणे एकीकडे सक्तीचे केले असताना त्यांना देण्यात आलेल्या इमारतींचे काय? असा सवाल आता होत आहे.