डेंग्यूला रोखण्यासाठी ‘आरोग्य विभाग आपल्या दारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:08+5:302021-06-25T04:23:08+5:30
चिपळूण : शहरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलंही आजारी पडत आहेत. गेले १५ दिवस ...
चिपळूण : शहरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलंही आजारी पडत आहेत. गेले १५ दिवस नगर परिषद त्यावर फवारणीद्वारे उपाययोजना करीत आहे. मात्र, आता ज्या भागात संशयित रुग्ण आढळले, तेथे नगर परिषद आरोग्य विभागाने ‘आरोग्य विभाग आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषद आरोग्य विभागाने रुग्ण सापडलेल्या दहा ठिकाणी पाहणी केली. यामध्ये नवीन भैरी मंदिर परिसर, राऊत आळी, बापट आळी या भागात आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेविका संगीता रानडे, नगरसेविका रसिका देवळेकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, वैभव निवाते, सुमित भोळे, आशा सेविका सावर्डेकर यांनी पाहणी केली. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी डेंग्यूसदृश विषाणू आढळले. त्या ठिकाणी लगेच फवारणी केली. पावडरही टाकण्यात आली. इमारतीसमोरील तसेच मागील बाजूस असणारी पाणी साठण्याची ठिकाणे, बादल्या, दगडी हौद या सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच डेंग्यूसदृश विषाणूबाबत तेथील नागरिकांना माहिती दिली. ‘आरोग्य विभाग आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत आशा सेविकांमार्फत सर्वेक्षणही केले जात आहे.