मंडणगड तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:35+5:302021-07-22T04:20:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : कोरोना महामारीत दिवस-रात्र राबत असलेली तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच ओलीचिंब होऊन आजारी पडली आहे. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : कोरोना महामारीत दिवस-रात्र राबत असलेली तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच ओलीचिंब होऊन आजारी पडली आहे. या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना आता आपला संसार सावरण्यासाठी प्लास्टिकचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था फार बिकट झाली आहे.
शासनाने आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारली. पण त्यांची डागडुजी आणि देखभालीसाठी निधी दिला नसल्याने या इमारतींची आता दुरवस्था झाली आहे. यातील अनेक इमारती आज वापरात नाहीत, त्या इमारती वेळेत दुरूस्त न केल्यास शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाणार आहे. निवासाची व्यवस्था धड नसल्याने कर्मचारी तेथे राहत नाहीत आणि त्यामुळे स्थानिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासही विलंब होत आहे.
तालुक्यातील तीनही आरोग्य केंद्र उभारुन सुमारे १० ते १५ वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. कोरोना महामारीत सर्वाधिक निधी आरेाग्य विभागावर किंवा आरोग्यासाठी खर्च केला जात आहे. मात्र, तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात पत्रे उडून गेल्याने देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर येथील निवासस्थान पूर्णपणे गळत असल्याने येथील कर्मचाऱ्यांचा संसार पाण्यात भिजत आहे. त्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या कापडाचा आधार घेतला आहेे.
पणदेरी आरोग्य केंद्र अनेक असुविधा असतानाही सुरू करण्यात आले. त्यामुळे उभारणी झाल्यापासून दहा वर्षांत त्याचा वापर झाला नव्हता. या आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अधिकारी निवासस्थानही पूर्णपणे गळत असल्याने वापरात नाही. कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाचपैकी दोन निवासस्थानांचे सध्या काम केल्यामुळे ती वापरात आली आहेत तर तीन निवासस्थानांना गळती असल्यामुळे तेथे कोणीही राहात नाही. मात्र, अशा परिस्थितीतही तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे.
स्लॅबवर पत्रे नाहीत
कोकणात सर्वसाधारण ३,५०० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्लॅब टिकत नाही. त्यावर पत्रे किंवा कौले चढवावीच लागतात. मात्र, आरोग्य विभागाच्या सर्व इमारती स्लॅबच्या बांधण्यात आल्या आहेत. १० ते १५ वर्षांत त्यावर पत्रे टाकण्याचीही व्यवस्था संबंधित यंत्रणेला करता आलेली नाही. त्यासाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहे.
सुरुवातीपासूनच अपुऱ्या सुविधा
पणदेरी रूग्णालयाची इमारत उभी केली गेली तेव्हा तेथे पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता, पाणी नव्हते, वीज नव्हती. त्यामुळे इमारत उभारल्यानंतर दहा वर्षांनी आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने अत्यावश्यक गरजांची पूर्तता करून हे रूग्णालय वापरात आले. अद्याप या रुग्णालयाच्या इमारतीमधील काही खोल्यांमध्येच वीज आहे. अन्य खोल्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही.
टॉर्चवर होते प्रसुती
कुंबळे येथे तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण येतात. तालुक्यातील एकमेव प्रसुती केंद्र असणाऱ्या याठिकाणी इन्व्हर्टरची सुविधा नसल्याने अनेकवेळा टॉर्चच्या उजेडावर प्रसुती करावी लागत आहे.
निधीअभावी इमारती पडून
तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारती भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उभारल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. इमारती उभारून त्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या निधी कमतरतेमुळे त्या वापराविना नादुरूस्त आणि पडीक होत आहेत.