चुकीच्या अहवालामुळे निरोगी महिला चार तास कोरोना रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:07+5:302021-05-06T04:33:07+5:30

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला ...

Healthy woman in Corona hospital for four hours due to misreporting | चुकीच्या अहवालामुळे निरोगी महिला चार तास कोरोना रुग्णालयात

चुकीच्या अहवालामुळे निरोगी महिला चार तास कोरोना रुग्णालयात

googlenewsNext

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे एका निरोगी महिलेला चार तास कोरोना रुग्णालयात राहावे लागल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे. निगेटिव्ह असतानाही तिच्यावर कोरोना रुग्ण म्हणून उपचार सुरू करण्यात आले आणि नवीन अहवाल आल्यावर घाईघाईने तिला घरी पाठवून देण्यात आले.

तालुक्यातील नेवरे गावातील एका खासगी कंपनीने कंपनीतील २७ कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यामध्ये पाच जणांचे अहवाल कोरोनाबाधित म्हणून प्राप्त झाले. त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मंगळवारी दुपारी संबंधित महिलेच्या मोबाइलवर कोरोनाबाधित असल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे संबंधित महिलेचे कुटुंब हादरले. ग्राम कृती दल व आशासेविकेला माहिती समजताच त्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. गृहविलगीकरणात राहणार की रुग्णालयात दाखल होणार असे त्यांनी विचारले. या महिलेचे एकत्र कुटुंब असल्याने गृहविलगीकरण शक्य नाही. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची तयारी या महिलेने दर्शवली. त्यानुसार १०८ रुग्णवाहिका बोलावून संबंधित महिलेला रत्नागिरीतील महिला रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिला दाखलही करून घेण्यात आले. मात्र, चार तासांनंतर त्या महिलेच्या मोबाइलवर तिचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा संदेश आला. त्या महिलेने रुग्णालयातील डाॅक्टरांना संदेश दाखविला. त्यांनी कपाळावर हात मारत त्या महिलेला तातडीने रुग्णालयातून घरी जाण्यास सांगितले.

चार तास निरोगी असलेल्या महिलेला नाहक कोरोना रुग्णालयात, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये थांबावे लागले. या काळात त्या कुटुंबाची, त्या महिलेची खूप घालमेल झाली. आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोना उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. आरोग्य यंत्रणेवरील असलेला ताण, शिवाय आतापर्यंतची कामगिरी नक्कीच आदर्शवत आहे. मात्र, काही निष्काळजी लोकांच्या चुकीमुळे आरोग्य यंत्रणेची प्रतिमा नक्कीच मलिन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याबाबत ग्राम कृतीदलाचे अध्यक्ष व सरपंच दीपक फणसे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित प्रकार कानावर घातला असता, याबाबत चाैकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. शिवाय प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांशी याबाबत ग्रामस्थांनी चाैकशी केली असता, दिवसाला हजारो अहवाल तपासणीसाठी येत असतात, त्यामुळे एखाद्‌वेळी असा प्रकार होऊ शकतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अशा प्रकारचे चुकीचे रिपोर्ट रुग्णांच्या जिवाशी खेळ ठरू शकतात. त्यामुळे किमान एक दिवस अहवाल उशिरा प्राप्त झाला तरी तो योग्य व बिनचूक असणे योग्य आहे.

Web Title: Healthy woman in Corona hospital for four hours due to misreporting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.