कचऱ्याचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:26+5:302021-08-13T04:35:26+5:30
चिपळूण : गुहागर बायपास रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचा ढीग दिसू लागला आहे. चिपळूण शहरातील कचरा या रस्त्यालगत टाकला जात आहे. ...
चिपळूण : गुहागर बायपास रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचा ढीग दिसू लागला आहे. चिपळूण शहरातील कचरा या रस्त्यालगत टाकला जात आहे. तसेच उक्ताड व खेंड बावशेवाडी परिसरात उघड्यावर घरगुती कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आधीच खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरुन जाताना नागरिकांना दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे.
वाचनालयाला अनुदान
देवरुख : शहरातील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाला देवरुख नगर पंचायतीच्यातर्फे ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने सातत्याने अनुदानासाठी पाठपुरावा केला होता. ११० वर्षांपूर्वीचे हे वाचनालय असून, नागरिकांकडून मिळालेल्या देणगीतून हे वाचनालय चालवले जात आहे.
रेन हार्वेस्टिंगची माहिती
दापोली : न. का. वराडकर आणि रा. वी. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे दत्तक खेडे म्हाळुंगे कदमवाडीमध्ये रेन हार्वेस्टींग सिस्टीमची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी एफ. के. मगदूम यांनी केले. राष्ट्रीय जिल्हा योजनेचे समन्वयक एल. पी. पाटील आणि पर्यवेक्षक व्ही. टी. कमळकर यांनी रेन हार्वेस्टिंग सिस्टीमविषयी माहिती दिली.
जीवनावश्यक वस्तूवाटप
गुहागर : मुंबई येथील दीप जनसेवा समितीच्यावतीने स्वातंत्र्यदिनी चिपळूण तालुक्यातील चार गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम समितीचे प्रमुख सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील वाघिवरे, उमरोली, आंबेरे आणि मार्गताम्हाणे या गावांमध्ये हे वाटप केले जाणार आहे.
कोविड सेंटरला मदत
देवरुख : ठाणे जिल्ह्यातील जुगाई प्रतिष्ठानतर्फे संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथील कोविड केअर सेंटरला १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात नोकरी, व्यवसायानिमित्त कार्यरत असलेल्या कोसुंब गावातील ग्रामस्थांनी जुगाई प्रतिष्ठान स्थापन केले असून, त्याच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.