पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली, हाताला आलेली पिकं हिरावली
By मेहरून नाकाडे | Published: October 7, 2022 06:37 PM2022-10-07T18:37:08+5:302022-10-07T18:38:37+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी : हळवे भात तयार झाले असून निमगरवे, गरवे तयार होण्याच्या मार्गावर आहे. तयार भात शेतकऱ्यांनी कापण्यास प्रारंभ केला होता. मात्र दसऱ्यापासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली असून कापलेले भात पाण्यावर तरंगत असून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ‘निसर्गानं दिलं परंतु पावसाने हिरावलं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी मूळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. मात्र नंतर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने लागवडीची कामे मात्र वेळेवर आटोपली. जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी करतात.
हळवे भात तयार झाले असून दसऱ्याच्या पूर्वी चांगले कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला होता. कापणीनंतर दोन दिवस भात शेतावरच वाळवून नंतर झोडणी केले जाते. दसऱ्याच्या दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी, शनिवारी तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने भरली आहेत. त्यामुळे कापलेले भात पाण्यावर तरंगत आहे. शिवाय वारे व पाऊस यामुळे तयार उभी शेती जमिनदोस्त झाली आहे. पावसाचे पाण्यामुळे कापलेले भात कुजून दाण्याला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातही कापलेल्या भात पाण्यात तरंगत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पाण्यातून भात काढून रस्त्याकडेला किंवा कातळावर उंचवटयाच्या ठिकाणी भात वाळविण्यासाठी पसरविण्यात येत आहे. त्यासाठी अधिक मजूर करावे लागत असून भिजलेले भात वजनाला जड असल्याने वाहन भाड्याने घेवून अन्यत्र वाळविण्यासाठी नेण्याकरिता खर्च करावा लागत आहे. गरव्या भातासाठी पाऊस पोषक असला तरी हळव्या भात पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने दखल घेत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.