रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार सुरूच; दोन नद्या इशारा पातळीच्या वर
By मनोज मुळ्ये | Published: July 8, 2024 11:09 AM2024-07-08T11:09:22+5:302024-07-08T11:09:40+5:30
पावसात सातत्य राहिले तर नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि पूर येईल असे चित्र दिसत आहे.
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क|
रत्नागिरी : शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील आपला मुक्काम कायम ठेवला आहे. रविवारी दिवसभर कोसळलेला पाऊस रात्रीही मुसळधार सुरू होता. सोमवारची सकाळ ही मुसळधार पावसानेच झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसात सातत्य राहिले तर नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि पूर येईल असे चित्र दिसत आहे.
रविवारी दिवसभर अखंडितपणे पडणाऱ्या पावसाने रात्री काही वेळ विश्रांती घेतली. मात्र मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सोमवारी सकाळीही मुसळधारेने कोसळत आहे. या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर येथील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. अजूनही धोक्याची पातळीवर असली तरी पावसामध्ये सातत्य राहिल्यास पूर येण्याची भीती आहे.
रविवारी राजापूर शहरामध्ये दुपारी चार वाजल्यानंतर नदीचे पाणी जवाहर चौकापर्यंत आल्याने व्यापाऱ्यांनी लगबगिने आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.