मुसळधार पावसाचा गणपती पुळेत हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:53+5:302021-06-16T04:42:53+5:30
गणपतीपुळे : मुसळधार पावसाने गणपतीपुळे पंचक्रोशीत हाहाकार उडवला असून, येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला आहे. शनिवारपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये पडत ...
गणपतीपुळे : मुसळधार पावसाने गणपतीपुळे पंचक्रोशीत हाहाकार उडवला असून, येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला आहे. शनिवारपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये पडत असणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याने रस्ते खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गणपतीपुळे येथील नीलेश नारायण माने यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील भांडी, इतर गृहोपयोगी वस्तू, पावसाळ्यातील बेगमीसाठी आणलेले कांदे-बटाटे आदी वस्तू पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. संपूर्ण रात्र माने कुटुंबीयांना जागत काढावी लागली. गॅस शेगडी, फ्रिज, टेबलफॅन आदी उपकरणातही पाणी गेले आहे. अरुण काळोखे यांच्या शेताभोवती असलेला चिरेबंदी बंधाराही कोसळला आहे. त्यामुळे शेतात पाणी घुसल्याने भात, माड व इतर झाडे पाण्याखाली गेली आहेत.
गणपतीपुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील नुकसानग्रस्त भागाची गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, सदस्य संजय माने यांनी पाहणी केली. आपटा तिठा ते एसटी स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याबरोबर कचरा वाहत आला आहे.
मालगुंड महावितरण कार्यालयापुढे असलेल्या खारभूमी येथील श्याम सुर्वे यांच्या घरातही पाणी घुसल्याने, दुपारपर्यंत घराभोवती पाण्याने वेढा घातला होता. पुसाळकर यांच्या चक्कीजवळून, तसेच पंडित यांच्या घराजवळून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आल्याने, चिखल, माती रस्त्यावर आली आहे. भगवतीनगर येथील एक रस्ता पाण्याने वाहूून गेला आहे. रविवार, सोमवार दोन दिवस पावसाने जोरदार वृष्टी केल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत.