रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

By मनोज मुळ्ये | Published: July 14, 2024 12:45 PM2024-07-14T12:45:38+5:302024-07-14T12:46:06+5:30

पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे.

heavy rain in ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : शुक्रवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही आपला मुक्काम कायम ठेवून आहे, शनिवारी रात्रभर पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे खेड नगर परिषदेने सतर्कतेचा इशारा देणारा भोंगाही वाजवला आहे. पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे,

शनिवारी दिवसभर आणि रात्रीही मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा कायम असल्यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. सुदैवाने चिपळूणमध्ये सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. अन्यथा चिपळूण शहरालाही सतर्कतेचा इशारा देण्याची वेळ आली असती.

खेडमध्ये जगबुडी नदीच्या पात्राने मात्र धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरू शकते, अशी स्थिती आहे, त्याची दखल घेत नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवला आहे.

शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२२ मिलिमीटर म्हणजेच सुमारे पाच इंच इतका पाऊस पडला आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

Web Title: heavy rain in ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.