रत्नागिरी जिल्ह्यात जोर'धार', जगबुडी, कोदवली नदीने इशारा पातळी गाठली; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:03 PM2024-07-09T12:03:37+5:302024-07-09T12:03:59+5:30

मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद; पडझडीच्या घटना वाढू लागल्या

Heavy rain in Ratnagiri district, Jagbudi, Kodavali river reached alert level | रत्नागिरी जिल्ह्यात जोर'धार', जगबुडी, कोदवली नदीने इशारा पातळी गाठली; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी जिल्ह्यात जोर'धार', जगबुडी, कोदवली नदीने इशारा पातळी गाठली; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी : शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील आपला मुक्काम कायम ठेवला आहे. खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीच्या पाण्याने सोमवारीही इशारा पातळी गाठली आहे. दुपारपर्यंत काही काळ थोडी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. सोमवारी तब्बल १२१ मिलीमीटर सरासरी पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.५५ टक्के पाऊस पडला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

रविवारी दिवसभर अखंडितपणे पडणाऱ्या पावसाने रात्री काही वेळ विश्रांती घेतली. मात्र मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर येथील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. सकाळी १२ नंतर पावसाने अधूनमधून विश्रांती घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, दुपारी ४ वाजल्यानंतर लांजा वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने पुन्हा अधूनमधून जोरदार पाऊस पडत होता. दरम्यान रविवारी जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी ओसरली आहे. शास्त्री, काजळी, मुचकुंदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. मात्र, आता पाणी ओसरले आहे.

मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटात आलेले दगड, माती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील खेम धरणावर अंघोळीसाठी गेलेल्या ४ मुलांपैकी वाहून गेलेला कल्पेश बटावळे या मुलाचा शोध अजूनही सुरू आहे. टाळसुरे येथील करमरकर कुटुंबातील ३ व्यक्ती आणि जोशी कुटुंबातील व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
चिपळूण येथील परशुराम घाटातील वाहतूकही सध्या सुरळीत करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पुलावरून पाणी वाहू लागल्याने या भागातील २० घरे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

या वादळी पावसाने घरांचेही नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे अंकुश गुरसळे यांच्या चाळीचे अतिवृष्टीत ८३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आवरे येथील महादेव घाणेकर यांच्या घरावर सुपारीचे झाड पडून तर राजापूर तालुक्यातील होळी येथील मोहन गुरव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

जिल्ह्यात ८ रोजी नोंदविलेला पाऊस असा

तालुका - पाऊस (मिलीमीटर)
मंडणगड - १५८.६०
दापोली - १४७.१०
खेड - १३२.५०
गुहागर - ७९.७०
चिपळूण - ११४
संगमेश्वर - १३०.५०
रत्नागिरी - ५८.४०
लांजा - १४७.५०
राजापूर - १२५.८०
एकूण - १०९४.१०
सरासरी - १२१.५७

Web Title: Heavy rain in Ratnagiri district, Jagbudi, Kodavali river reached alert level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.