रत्नागिरीत पावसाची मुसळधार, अनेक ठिकाणी पडझड!
By शोभना कांबळे | Published: October 1, 2023 03:07 PM2023-10-01T15:07:00+5:302023-10-01T15:07:16+5:30
तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
रत्नागिरी : पावसाने शनिवारपासून संततधार धरली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुके वगळता रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर असून, रत्नागिरीत मात्र, मुसळधार सुरू आहे. तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. रत्नागिरी तालुक्यात रात्रीपासून संततधार सुरू असून, वादळी वारेही जोरदार वाहत होते. मध्येच विजेचा गडगडाटही होत होता. रत्नागिरी शहरातील भाट्ये येथे रस्त्यावर झाडे आली असून, रस्त्याच्या बाजूला असणारे फलकही काेसळून पडले आहेत. तसेच किल्ला परिसरातील हनुमानवाडी येथे रस्त्यावर दगड काेसळला आहे. थिबापॅलेस परिसरातील एका घराचे छप्परही काेसळले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पाऊस सरींवर सुरू होता.
गेल्या दिवसभरात जिल्हाभरात १९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३०६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असून मच्छिमारांनीही मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.