रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:46 PM2022-06-14T17:46:55+5:302022-06-14T17:47:22+5:30
गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.
रत्नागिरी : मान्सून कोकणच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, येत्या ४८ तासांमध्ये कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मान्सून अलर्ट जारी केला आहे. उर्वरित विभागात येणाऱ्या पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि परिसरातही मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासांत कोकणात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पोषक वातावरणाने गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.
दुसरीकडे, कोकणसह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडिचेरी भागात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडू तसंच विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागात पोहोचेल.
अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला ९ जूनपासून चांगली चालना मिळाली आहे. पोषक वातावरण तयार झाल्याने १० जूनला पावसाने गोवा पार करून दक्षिण कोकणातून पूर्वमोसमी पावसाने हलकी चाहूल दिली. सध्या मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल वातावरण असल्याने पुढील ४८ तासांमध्ये मान्सूनचा प्रवास देशव्यापी होत जाईल.