रत्नागिरीत मुसळधार पाऊस; रघुवीर घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:50 PM2019-07-11T23:50:59+5:302019-07-11T23:52:19+5:30
राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
लांजा तालुक्यात रस्त्यांवर पाणी आल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. अर्थात या पावसामुळे शेतीच्या कामांनी मात्र वेग घेतला आहे. आज, शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने पाऊस अधिक जोर घेणार, असा अंदाज आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री जगबुडी आणि वाशिष्ठी पुलांवरून बंद करण्यात आलेली वाहतूक गुरुवारी सकाळी पूर्ववत झाली आहे. मंगळवारपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही दिवसभर सुरू होता. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे राजापूर शहरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी आले. नगर परिषदेने सतर्कतेचा भोंगा वाजविल्यानंतर राजापुरातील सर्व शाळा तत्काळ सोडून देण्यात आल्या. वाढत्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे व्यापाºयांनी तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला.
रघुवीर घाटात आकल्पे गावानजीक दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटला. बुधवारी रात्री ही दरड कोसळली. सातारा जिल्ह्यातील १५ गावांचा खेड तालुक्याशी संपर्क असतो. या गावांशी आता पूर्ण संपर्क तुटला आहे. खेडचे तहसीलदार
शिवाजी जाधव यांनी तेथे भेट दिली असून, दरड हटविण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या गेल्या २४ तासांतील प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १२७७ मिलिमीटर एवढी एकूण पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत खेडमध्ये सर्वाधिक १४१ मिलिमीटर, तर त्या खालोखाल संगमेश्वर (१२३ मिलिमीटर), दापोली (११६ मिलिमीटर) तालुक्यात पाऊस झाला आहे. आतापर्यंत मंडणगडमध्ये सर्वाधिक (१७१४ मिलिमीटर) पाऊस झाला असून, सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात (८७९ मिलिमीटर) झाला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे गुरुवारी सकाळी आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, खेड तालुक्यात हेदली येथील मोहन घाणेकर यांच्या घराचे अंशत: ६,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात कळंवडे येथील तुकाराम वरपे आणि दिनशाद चौघुले यांच्या घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या नदीच्या पातळीत बुधवारी रात्री वाढ झाल्याने पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील दाभोळ येथील दीपक पितळे यांच्या घराचे अंशत: ४,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील नाझिम काझी यांच्या गाडीवर झाड पडल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.