जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:48+5:302021-06-19T04:21:48+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून, ३९० मिलिमीटर (सरासरी ४३.३३ मिलिमीटर) एकूण पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली पाजपंढरी येथे भागवत पावसे यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोली येथील काशिनाथ जाधव यांच्या घराचे अंशत: चार हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोश्वर येथील बाळाराम डेवणकर यांच्या घराचे पावसामुळे तीन हजार ९५० एवढे नुकसान झाले आहे. शिरसोली येथे दिनकर जाधव यांच्या घराचे एक हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसाडी येथील वसंत वाजे यांच्या घराचे अंशत: दोन हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांच्या घराचे अंशत: आठ हजार ४५० रुपये नुकसान झाले आहे. माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: चार हजार ५०० रुपये नुकसान झाले आहे.
चिपळूण तालुक्यात कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ती हटविण्याचे काम चालू आहे. पर्यायी आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: २४ हजार रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पडवे येथील शमशाद शिरगावकर यांच्या घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश रसाळ यांच्या घराचे अंशत: २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. पडवे येथील कैसर शिरगाव यांच्या घराचे अंशत: नऊ हजार रुपये नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: पाच हजार ४०० रुपये नुकसान झाले आहे. देवळे बौद्धवाडी येथील सिद्धार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पक्क्या विहिरीचे अंशत: एक लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. तुळसणी येथील ग्रामपंचायतीजवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सध्या पावसाचा जोर असला तरी पावसाची संततधार थांबली आहे. शुक्रवारी दिवसभर पाऊस सरींवर कोसळत होता. या पावसाने तापमान खाली आले असून वातावरणात गारवा आला आहे.