पावसाला जोरदार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:20 AM2021-07-09T04:20:54+5:302021-07-09T04:20:54+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पावसाने पुन्हा चांगलाच जोर घेतला आहे. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पावसाची सुरुवात ...
रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पावसाने पुन्हा चांगलाच जोर घेतला आहे. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पावसाची सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनाने जिल्ह्यात पुन्हा उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पाठ फिरवायला सुरुवात केली. सुरुवातीला पावसाने चांगलाच हात दिल्याने जिल्हयात पेरणीची कामे वेळेत झाली होती. रोपेही लवकर उगवून आली होती. त्यामुळे काहींनी लावणीला सुरुवात केली. मात्र ज्यांच्या पेरण्याच उशिरा झाल्या, त्यांच्या लावणीलाही उशीर झाला. मात्र, याच काळात पावसाने पाठ फिरवली.
सुमारे १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लावणीची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी कडक उन्हामुळे रोपे सुकून गेल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. काही ठिकाणी उन्हामुळे शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बळीराजा आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रात्री पाऊस पडायला सुरुवात झाली होती; मात्र दिवसा पुन्हा कडक ऊन पडू लागले. त्यामुळे पुन्हा कामाचा खाेळंबा होत असे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून होता. नदीकाठावरील शेती असलेल्यांनी नदीच्या पाण्याच्या साहाय्याने लावणी करून घेतली. मात्र, जे शेतकरी पावसावर अवलंबून होते, त्यांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
अखेर गुरुवार सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी पडत होत्या. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरून ९ जुलैपासून पाऊस जोरदार कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, गेल्या २४ तासांत एकूण १३४.३० मिलिमीटर (सरासरी १४.९२ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे.