मुसळधार पावसाने रत्नागिरीत पडझड
By admin | Published: July 15, 2014 11:41 PM2014-07-15T23:41:42+5:302014-07-15T23:45:14+5:30
नवीन भाजीमार्केट इमारतीला धोका
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह तालुक्यातील विविध भागांना आज (मंगळवार) मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मिरकरवाडा येथे घराची, तर मच्छिमार्केटजवळ खान कॉम्प्लेक्सची संरक्षक भिंत कोसळली. शहर बाजारपेठेतील नवीन भाजी मार्केट इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, तर मुरुगवाडा येथील लिलाधर नागवेकर, मनोज नागवेकर यांच्या घरात पावसाचे साचलेले पाणी शिरले.
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या नाले भरून वाहात आहेत. मात्र, आता या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती, संरक्षक भिंती फुगल्याने कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील मुरुगवाडा येथील मनोज नागवेकर, लीलाधर नागवेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. या भागात असलेले गटार चार वर्षांपूर्वी बंद केले गेल्याने पाणी जाण्यास जागाच नाही. त्यामुळे साचलेले पाणी घरात, माजघरात, स्वयंपाक घरात, बाथरुममध्येही शिरले आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येने हे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. गटाराची समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा या कुटुंबीयांनी दिला आहे.
मिरकरवाडा किल्ला पायथ्याशी असलेल्या निसार दर्वे यांच्या घरासाठी उभारलेली दगडी संरक्षक भिंत आज पावसाच्या तडाख्याने कोसळली. त्यामुळे दर्वे यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी दर्वे यांनी केली आहे. ही संरक्षक भिंत कोसळल्याने त्यालगत उंचावर असलेल्या रत्नकांत बावकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.
शहरातील नवीन भाजी मार्केटची इमारत मोडकळीस आली असून, पावसामुळे आज या इमारतीच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग जमिनीवर कोसळला. त्यावेळी तेथे असलेल्या भाजी दुकानांजवळ कोणीही ग्राहक नव्हते.
या इमारतीत भाजी विक्रीचे ३0 गाळे असून, त्यातील २८ गाळे सुरू आहेत. इमारत मोडकळीस आली असून, मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष आहे.
जमीन खचल्याने मच्छी मार्केटजवळील खान कॉम्प्लेक्सच्या संरक्षक भिंतीचा काही भागही मुसळधार पावसाने कोसळला. सायंकाळी उशिरापर्यंत कोसळेली भिंत व माती उचलण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)