rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:08 PM2022-08-08T14:08:11+5:302022-08-08T14:25:16+5:30
अनेक भागात दरडी कोसळल्या.
रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावांमधील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागात दरड कोसळली आहे. दरम्यान, लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
रघुवीर घाटात दरड कोसळली
खेड तालुक्यातील जगबुडी नदीने दोन दिवसांतच इशारा पातळी ओलांडली आहे. रविवारपासून पावसाचा जाेर अधिकच वाढल्याने जगबुडी नदीपाठोपाठ उंच पात्र असलेल्या काजळी नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. साेमवारी रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने दरड बाजुला करण्याचे काम बराच वेळ सुरू होते.
गावांना सतर्कतेचा इशारा
खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील काजळी नद्यांचे पात्र धोका पातळीच्याही वर आल्याने आजुबाजुंच्या गावांमध्ये पाणी भरू लागले आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी, बावनदी, राजापुरातील कोदवली या नद्यांचे पात्र इशारा पातळीवरून वाहात आहे. काही गावांमधील पूलही पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
रत्नागिरी तालुक्यातही खेडशी येथे सकाळी घराशेजारी दरड कोसळली आहे. तर चांदेराई, हरचेरी आदी गावांमध्ये पुलाखालून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लांजात सर्वाधिक पावसाची नोंद
गेल्या २४ तासात जिल्ह्यात १६४३ मिलीमीटर (१८२.५६ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. लांजात सर्वाधिक २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असूनमंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्येही २०० ते २२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल रत्नागिरी, संगमेश्वर, राजाापूर आणि खेड या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीची नोंद आहे.