रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:09 PM2022-07-04T19:09:36+5:302022-07-04T19:10:00+5:30

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.

Heavy rains in Ratnagiri, two major rivers crossed the warning level | रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

googlenewsNext

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसले तरीही रात्री मुसळधारेने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी आज, सोमवारी इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यात जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काज़ळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या मुख्य नद्या आहेत. पावसाळ्यात या सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह अन्य कोकण भागात पावसाने सुरुवात केली आहे. अजूनही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने यापैकी काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यात खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वर - लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांचा समावेश आहे. तसेच वाशिष्ठी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे.

जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मात्र, सायंकाळी या नदीची पाणी पातळी ६.५० मीटर इतकी झाली होती. तर काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर तर धोक्याची पातळी १८ मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी या नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ मीटरपेक्षा अधिक वाढली.

Web Title: Heavy rains in Ratnagiri, two major rivers crossed the warning level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.