जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:42+5:302021-06-18T04:22:42+5:30
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. बुधवारपासून वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ...
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. बुधवारपासून वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे यांच्या पडझडीला सुरूवात झाली असून, दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६९७.२० मिलिमीटर (सरासरी ८३.४४ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक १६५ मिलिमीटर तर त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १०९.२० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली तालुक्यात हर्णै येथील रफीक अहवास बुरोंडकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडले आहे. पिचकोळी येथे निर्मल कुळये यांच्या घराचे अंशत: ५७ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. सालदुरे येथील सुरेश खेडेकर यांच्या घराचे अंशत: १ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. आसूद येथे अर्जुन रांगले यांच्या घराशेजारील दगडी संरक्षक भिंत कोसळून अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. राजापूर येथे मारुती मोकल यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ४ हजार रुपयांचे नुकसान झाले. पिचकोळी येथे नारायण चौगुले यांच्या घराचे अंशत: ७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. पाजपंढरी येथे बाळकृष्ण दोरकुळकर यांच्या घराचे अंशत: २ हजार रुपयांचे नुकसान झाले. पाजपंढरी येथे मुरुडकर यांच्या घराचे अंशत: ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच पांडुरंग दोरखुडकर यांच्या घराचे अंशत: ७ हजार रुपयांचे नुकसान झाले. हर्णै येथे बिलाल अश्रफ मेमन यांच्या दुकानाचे अंशत: ४७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले.
चिपळूण तालुक्यात आरे-वाली-पिंपळघर येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. अंदाजे ३५ हजार रुपये नुकसान झाले आहे. चिखली - कारळ पांगारी येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. अंदाजे १८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हलवून वाहतूक सुरळीत केली. कळकवणे - आतले रस्ता येथे आंब्याचे झाड पडल्याने व पुलाच्या बाजूचा रस्ता खचलेला असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. झाड काढण्याचे काम सुरु आहे.
संगमेश्वर तालुक्यात आरवली - शिंदेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. रत्नागिरी तालुक्यात निवळी घाट येथे रस्त्यावर रात्री दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. ही दरड बाजू करण्याचे काम सुरू असून, पालीमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात कौजे मागरे सडेवाडी येथे सुभाष शिवगण यांच्या घराचे पत्रे उडून घरात शिरल्याने धान्याचे नुकसान झाले.
बुधवारी रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. गुरूवारी सकाळीही जोर कायम होता. दुपारनंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. मात्र, रात्री पुन्हा जोर वाढण्याची शक्यता वाटत होती.