अति पावसाने भात पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:23+5:302021-09-25T04:34:23+5:30
दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके ...
दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके बहरली असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते; परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी भात पिकाचे नुकसान झाले होते. तीच परिस्थिती यावर्षीही येण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे काही लोक पूर्वापार शेती व्यवसायाकडे वळले आहेत. गेल्या दोन वर्षात मुंबई, पुणे या शहरातील बहुतेक लोकांनी गावी येऊन शेती केली आहे. त्यामुळे कोकणातील भातशेती क्षेत्रात वाढ झाली आहे; पण आता अति मुसळधार पावसाने हे पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समाधानकारक पावसामुळे भाताचे पीक अतिशय जोमदार आले आहे; परंतु या पावसामुळे दाणा भरण्याची प्रक्रिया रखडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्या भागातील भात शेतीत दाणे भरले नाहीत, अशा शेतीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.