मोठी वित्तहानी करून पावसाची रजा
By admin | Published: September 25, 2016 11:01 PM2016-09-25T23:01:28+5:302016-09-25T23:01:28+5:30
खेडमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर : स्वच्छतेचे काम सुरु; मुंबई-गोवा महामार्ग ठप्पच
रत्नागिरी : गेल्या दहा दिवसात अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने नागरिकांना हायसे वाटले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याच्या अनेक भागात मोठी वित्तहानी झाली असून, खेड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता जिल्हावासी सावरू लागले आहेत. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओल्या दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाचे पहिले ९ दिवस अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे उत्सवप्रेमींमध्येही समाधान होते. मात्र, त्यानंतर पावसाने जिल्ह्यावर संततधार धरली होती. मात्र, हा पाऊस जोराचा नव्हता. परंतु, गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. चिपळूण व खेड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी भरले. चिपळूण शहरातही पाणी भरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चिपळूणमधील पुराचे संकट दूर झाले.
खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी भरल्याने त्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाशी या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, रविवारी पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतली. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाची रिमझिम झाली. पावसाच्या विश्रांतीमुळे नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हा आता या संकटातून सावरू लागला आहे. (प्रतिनिधी)
४तब्बल नऊ दिवसानंतर अथक बरसणाऱ्या पावसाची विश्रांती.
नागरिकांनी सोडला नि:श्वास.
खेड तालुक्याला सर्वाधिक फटका.
खेडसह चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर.
जिल्ह््यात शेतीचे मोठे नुकसान.
ओला दुष्काळ पडण्याची भीती.
चिपळूण, खेडमध्ये अनेक ठिकाणी भरलेले पाणी ओसरले.
खेडमध्ये ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेले. बस पडल्या अडकून.
नद्या, नाल्यांना आलेला पूर ओसरला.
नुकसानीचे पंचनामे सुरु.