लांजा पूर्व भागाला अवकाळी पावसाने झाेडपले; वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे, कौले गेली उडून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:28 PM2022-04-07T19:28:07+5:302022-04-07T19:28:32+5:30
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले.
लांजा : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले. पावसाचा सर्वाधिक फटका पालू गावाला बसला. वादळी वाऱ्याने येथील अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौले उडून गेली आहेत. त्यामुळे आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लांजा तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने पालू गावात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालू गावातील अनेक घरांवरील कौले, सिमेंट पत्रे उडवले. यामध्ये येथील ग्रामस्थ बंटी गाडे यांची दोन आंबा कलमे वादळी वाऱ्यामुळे मोडून पडली.
विनोद अवसरे यांच्या घरावरील सुमारे १,२०० कौले उडून गेली आहेत. तसेच सागर गाडे, संदीप गाडे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेले आहेत. प्रकाश जावडेकर, सुरेश गाडे यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे, अशोक शिवराम खाके यांच्या फार्म हाऊसवरील पूर्ण छप्पर उडून गेले आहे. वादळी वाऱ्यासह काेसळलेल्या पावसामुळे सर्व ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.