आवश्यकता भासल्यास चिपळूणात हेलिकाॅप्टरद्वारे मदतकार्य करणार : अनिल परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:01+5:302021-07-23T04:20:01+5:30
रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू ...
रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. यात बाधित झालेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था सुरू आहे. पुरात अडकलेल्यांना फूड पॅकेट्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असल्यास हेलिकाॅप्टरची सोयही करण्यात आली आहे, हे निसर्गाचे संकट असल्याने लोकांना धीर देऊन, बचावकार्य करणे, मदत करणे यालाच सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत कोकण आयुक्त विलास पाटील, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री परब यांनी चिपळुणात २००५ सालापेक्षाही स्थिती भयंकर असल्याचे नमूद केले. कोळकेवाडी धरणात रात्री २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने या धरणाचा विसर्ग करणे अपरिहार्य होते. त्यामुळे पहाटे चिपळुणातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी खासगी ४ बोटी, कोस्ट गार्ड, पोलीस यांच्या प्रत्येकी एक आणि चिपळूण नगर परिषदेच्या दोन बोटी यांच्या माध्यमातून नागरिकांना हलविले जात आहे. एनडीआरएफचे २३, २३ जणांचे ग्रुप चिपळूण आणि खेड येथे मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमसोबतच स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून रोप आणि ट्यूब यांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले आहे. पूरबाधितांचे सावर्डे तसेच अन्य उंच ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूणप्रमाणेच खेडमध्येही एनडीआरएफ टीमसोबत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.
रात्री चिपळुणातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पहाटेच ३ वाजता जिल्हा मुख्यालयातून ३० लोकांना पाठविण्यात आले, ते मदतकार्य करत आहेत. सकाळी साहित्य मुख्यालयातून पाठविण्यात आले आहे. तातडीने मदतकार्य सुरू असल्याने पुढील दोन तासात परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी दिली.