‘त्या’ विद्यार्थिनीला उद्योजक गणेश चाचेंचा मदतीचा हात...!

By admin | Published: June 10, 2016 11:32 PM2016-06-10T23:32:16+5:302016-06-11T00:55:55+5:30

तिच्या या जिद्दीचे कौतुक करणारी आणि परिस्थितीवर मात करुन यशस्वी होता येते, ही तिची कहाणी इतरांना आदर्श ठरावी, यासाठी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती.

'Help' student entrepreneur Ganesh Chanchen ...! | ‘त्या’ विद्यार्थिनीला उद्योजक गणेश चाचेंचा मदतीचा हात...!

‘त्या’ विद्यार्थिनीला उद्योजक गणेश चाचेंचा मदतीचा हात...!

Next

सचिन मोहिते -- देवरुख --घरची परिस्थिती बेताची असतानादेखील दुर्गम, डोंगराळ ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील मुलीने मिळवलेले गुण नक्कीच कौतुकास्पद असल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. दादासाहेब सरफरे विद्यालयात प्रथम आलेल्या शिवने गावातील प्राची रमेश जाधव या विद्यार्थिनीची बातमी वाचून सीताराम चाचे स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व मुंबईतील उद्योजक गणेश चाचे यांनी अकरावी - बारावीच्या शैक्षणिक खर्चाचा सर्व भार उचलला आहे. या दोन वर्षांसाठी त्यांनी प्राची हिला दत्तक घेतल्याचे सांगितले. संगमेश्वर तालुक्यातील शिवने - बौद्धवाडी येथील प्राची रमेश जाधव हिने परिस्थितीवर मात करीत आणि कोणतेही खासगी क्लासेस न लावता शहरी विद्यार्थ्यांना लाजवेल, असे यश मिळवत सेमी इंग्रजी माध्यमातून दहावीमध्ये प्राचीने ९५.८० टक्के गुण प्राप्त करुन दादासाहेब सरफरे विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करीत विद्यालयात सर्वाधिक अधिक गुण मिळवण्याचा रेकॉर्डही तिने केला आहे. तिचे वडील तिसरी, तर आई चौथी शिकलेली आहे.
घरात शैक्षणिक वातावरण असे काही नाही आणि घरची स्थिती तशी जेमतेमच आहे, असे असतानादेखील शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे सेमी इंग्रजीत मिळविलेले यश हे खरोखरीच आदर्शवत आहे. हे यश केवळ तिने बाळगलेली जिद्द आणि सरफरे विद्यालयातील शिक्षकांमुळेच ती मिळवू शकली. तिच्या या जिद्दीचे कौतुक करणारी आणि परिस्थितीवर मात करुन यशस्वी होता येते, ही तिची कहाणी इतरांना आदर्श ठरावी, यासाठी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती.
शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच उद्योजक गणेश चाचे यांनी प्राची हिचा अकरावी - बारावी विज्ञान शाखेच्या दोन वर्षांचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन वर्षांसाठी आपण तिला दत्तक घेणार असल्याचे उद्योजक गणेश चाचे यांनी जाहीर केले.


आई - वडील भारावले
चाचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी देऊ केलेली मदत आपल्या मुलीसाठी प्रेरणादायीच असेल. यामुळे प्राचीच्या शैक्षणिक विकासाला हातभार लागून ती मदतीचे सोने करेल. आज ‘लोकमत’ने ही बातमी दिली आणि बातमी वाचून जी मदत आम्हाला मिळतेय, त्यासाठी आम्ही लोकमतला धन्यवाद देत असून, गणेश चाचे यांचे मनोमन आभार व्यक्त करीत आहोत.


‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन आज जी मदत उपलब्ध होत आहे ती मदत जाधव कुटुंबियांना आधार देणारी ठरणार आहे. ‘लोकमत’ला धन्यवाद देऊन चाचे ट्रस्टचे आभार मानतो.
- प्रमोद मोहिते गुरुजी
शिवने बौद्धजन विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी.

Web Title: 'Help' student entrepreneur Ganesh Chanchen ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.