चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:13+5:302021-07-27T04:33:13+5:30

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे ...

Helping 'flood' in Chiplun | चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

Next

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर अनेकजण चिपळूणकरांच्या मदतीला धावले आहेत. जात, धर्म, पंथ सारे विसरून माणुसकीच्या धर्मातून मदतीचा महापूर लाेटला आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय असंख्य लोकांनी काबाडकष्ट करून फुलवलेला संसार उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे ‘होत्याचे नव्हते’ झाल्याने चिपळूणकरांच्या दु:खाने सर्वच हादरले आहेत. प्रशासनाकडून मदतीची हाक देण्यात आली आहे. प्रत्यक्ष प्रशासनाकडे जमा झालेली मदत अल्प आहे. मात्र, कित्येकपटीने लोक, संस्था स्वत:हून मदतीसाठी पूर आलेल्या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रशासनाकडे २०० किलो तांदूळ, २०० किलो गहू, ५० किलो कडधान्यासह अन्य वस्तूंचे संकलन सुरू आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने लोक, संस्थांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. धान्य, खाद्यपदार्थ, दूध, बिस्कीटे, चटई, कपडे, फिनेल, झाडू, भांडी, औषधे, मेणबत्या, माचीस यांची आवश्यकता असून, प्रत्येकाला जे-जे शक्य होईल ती मदत केली जात आहे. ज्यांना मदतीच्या ठिकाणी जाणे शक्य नाही, त्यांनी संस्थांच्या माध्यमातून मदत दिली आहे. अनेक संस्थांनी आपापल्या कार्यालयात संकलन केंद्र उभारले आहे. त्याठिकाणी संकलन सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, राजीवडा, मिरकरवाडा येथून तातडीने छोट्या बोटी घेऊन नागरिक रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावले होते. त्यानंतर लोकांच्या राहण्याची व्यवस्था झाली. मात्र, त्यांच्या खाण्याची, कपड्यांची व्यवस्था होणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावातील मुस्लिम मोहल्ले, संस्थांनी पुढाकार घेत चपाती, भाजी, खिचडी, पुलाव तयार करून पाठवला. अनेकांनी पाण्याचीही व्यवस्था केली. मुलांसाठी बिस्कीटे, दुधाचे टेट्रापॅक, फरसाण, चिवडा, चकल्या, वेफर्स, लाडू असा खाऊही पाठविण्यात येत आहे. अनेकांनी जुने, नवे कपडे दिले आहेत. कोरोना व संक्रमण याची भीती न बाळगता लोक निव्वळ मदतीसाठी धावत आहेत. कुणी किती मदत केली त्यापेक्षा आपण आणखी काही करू शकतो का, यासाठी धडपड सुरू आहे. नाम फाऊंडेशन, जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, वैश्य युवा समाज, राष्ट्रसेविका समिती, शिक्षक- कर्मचारी संघटना, हेल्पिंग हॅण्ड, संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे मदत देण्यात येत आहे.

------------------------

साफसफाईसाठी मदत

साहित्य, वस्तूंची मदत करण्यात येत असली तरी साफसफाईसाठी मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व पाण्याची आवश्यकता आहे. जयगड येथून दोन पाण्याचे टॅंकर पाठविण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनी पाण्याच्या टाक्या भरून चिपळुणात मदतीसाठी धाव घेतली आहे. कोकणनगर, मिरकरवाडा, चांदेराई, राजीवडा, कर्ला, साखरतर आदी मोहल्ल्यांतील युवकांनी ग्रुप तयार केले असून, पूरजन्य भागातील साफसफाई, चिखल काढण्यासाठी ते मदत करत आहेत.

Web Title: Helping 'flood' in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.