राजीवडावासीयांकडून १५०० पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:34+5:302021-07-31T04:31:34+5:30

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा ...

A helping hand to 1500 flood victims from Rajivada residents | राजीवडावासीयांकडून १५०० पूरग्रस्तांना मदतीचा हात

राजीवडावासीयांकडून १५०० पूरग्रस्तांना मदतीचा हात

Next

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा केला. तसेच मुरादपूर भागामध्ये सुमारे ४७ पूरग्रस्तांचे जीव वाचवले. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राजीवडा गावातील ६० तरुणांचे पथक आजही पूरग्रस्त भागात कार्यरत आहे.

चिपळुणात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राजीवडा गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या मदतीसाठी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नजीर वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन बोटी घेऊन भातगावमार्गे शब्बीर भाटकर, इमरान सोलकर, आसिफ वस्ता, कमरुद्दीन गडकरी, मुजाहीद तांडेल, सलमान जांभारकर, रशिद वस्ता, सनाऊल्ला गडकरी, शादाब तांडेल आणि रुहान गडकरी हे दर्यावर्दी पथक गेले होते. या लहान बोटी असल्यामुळे काहींनी या पथकाची चेष्टाही केली. मात्र, या पथकाने मुरादपूर परिसरात ४७ पूरग्रस्तांना मदत करुन वाचवले. त्यावेळी एका कारशेडच्या छप्परावर मगर होती. तरीही जीवाची पर्वा न करता या पथकाने मदतकार्य सुरुच ठेवले होते.

पूरग्रस्त भागात पथक कार्यरत असताना राजीवडावासीयांनी गावामध्ये फिरुन अन्नधान्य, पाणी बाटल्या, कपडे, बिस्कीटे आदी मदत गोळा करुन चिपळूणच्या दिशेने रवाना केली. आठवडाभर लोक मदतीसाठी धावाधाव करत होते. राजीवडा गावातून सुमारे २१ गाड्या घेऊन तरुण मंडळी चिपळुणात मदतकार्य करत होती. पेठमाप, गणेश मंदिर, मुरादपूर, खेर्डी, गोवळकोट व अन्य भागातील सुमारे १,५०० लोकांपर्यंत घरोघरी जाऊन मदत केली. सतत तीन दिवस ही मदत सुरु होती.

महापुरानंतर आता चिखल साफ करण्यासाठी राजीवडा गावातील मुफ्ती समिऊल्ला आणि अल्ताफ बुड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या ६० जणांच्या पथकाने गेल्या तीन दिवसात पूरग्रस्त भागात मंदिर, मस्जिद तसेच चिखलमय झालेल्या घरांच्या स्वच्छतेची मोहीम राबविली. ही सर्व घरे स्वच्छ करुन तेथील रहिवाशांना अन्नधान्याची मदतही केली. त्यानंतर आणखी एक ६० जणांचे पथक चिपळुणातील पूरग्रस्त भागात स्वच्छता करण्यासाठी रवाना झाले आहे. राजीवडावासीयांच्या या कामाबद्दल पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------------

समिती स्थापन

राजीवडा गावात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सलाऊद्दीन सुवर्णदुर्गकर, शब्बीर भाटकर, जावेद मस्तान, नजीर वाडकर, मुफ्ती समिऊल्ला, अल्ताफ बुड्ये, इमरान सोलकर, शौकत पावसकर, लुकमान कोतवडेकर, मौलाना मुनीर वस्ता, तौफीक वस्ता, हाफिज मुतलीब, शहजाद भाटकर, मुजीब पावसकर, नुमान गडकरी, तौहीद वस्ता आदींचा समावेश आहे. ही समिती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सतत कार्यरत आहे.

Web Title: A helping hand to 1500 flood victims from Rajivada residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.