साखरतरवासीयांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:00+5:302021-07-27T04:33:00+5:30
रत्नागिरी : शहराजवळील साखरतर येथील ग्रामस्थांकडून अन्नधान्यासह आर्थिक मदतीचा हात चिपळुणातील पूरग्रस्तांना देण्यात आला. साखरतर येथील तरुण स्वत: ...
रत्नागिरी : शहराजवळील साखरतर येथील ग्रामस्थांकडून अन्नधान्यासह आर्थिक मदतीचा हात चिपळुणातील पूरग्रस्तांना देण्यात आला. साखरतर येथील तरुण स्वत: पूरग्रस्तांना ही मदत देण्यासाठी चिपळूण येथे गेले हाेते.
चिपळुणातील पूरग्रस्तांसाठी रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यातून मदतीसाठी धावाधाव करण्यात आली. साखरतर गावातून ४ गाड्यांसह तीन बोटी घेऊन मदतीसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण चिपळूण, खेड येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले होते. सतत तीन दिवस ही मंडळी पूरग्रस्तांना मदत करत होती. साखरतर येथून अन्नधान्यासह सुमारे दीड लाख रुपयांची आर्थिक मदतही पूरग्रस्तांना करण्यात आली.
मशिदीतून आवाहन केल्यानंतर साखरतर गावातील अकबर मोहल्ला, रहेबर मोहल्ला आणि रेहमत मोहल्ला या तीन मोहल्ल्यांतील महिला, पुरुष तसेच तरुणांनी मदतीचा हातभार लावला. साखरतरवासीयांनी एकीचे दर्शन घडवत पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली. ही सर्व मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आली. यापुढेही प्रत्येक घरातून मदतीचा ओघ सुरु राहणार आहे.