शासकीय रक्तपेढीच्या मदतीला धावले हेल्पिंग हँडस्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:28+5:302021-09-08T04:37:28+5:30
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. या शासकीय रक्तपेढीवर असंख्य रुग्ण अवलंबून असल्याने रक्ताची ...
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. या शासकीय रक्तपेढीवर असंख्य रुग्ण अवलंबून असल्याने रक्ताची टंचाई जाणवू लागताच हेल्पिंग हँडस् फोरममधील सर्व संस्था पुन्हा एकवटल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून बुधवार, ८ सप्टेंबर रोजी शहरातील जयस्तंभ भागातील गीताभवन येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसिस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दात्यांची संख्या घटली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसिमिया, हिमोफिलिया रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.
सध्या या रुग्णालयात विविध साथींच्या आजारांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, तसेच प्रसूती, डायलिसिस रुग्ण, तसेच सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने त्यांनाही प्लेटलेटस्ची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने दात्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या वाढलेल्या लसीकरणाचा परिणामही रक्त संकलनावर होत आहे. त्यामुळे रक्तपेढीत रक्त संकलन घटले आहे.
रक्तपेढीतील रक्ताची गरज लक्षात घेऊन पुन्हा हेल्पिंग हँडस् मदतीसाठी पुढे आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विचारातून हा फोरम निर्माण झाला आहे. सध्या शासकीय रक्तपेढीसाठी रक्तसंकलनाची गरज लक्षात घेऊन ‘हेल्पिंग हँडस्’द्वारे बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन हेल्पिंग हँडस्कडून करण्यात येत आहे. नोंदणीसाठी श्रीवल्लभ वणजू, कुणाल शेरे, श्यामल शेठ यांच्याशी संपर्क साधावा.