शरद पवार सरकार टिकविण्यासाठी लाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:16+5:302021-08-25T04:36:16+5:30
चिपळूण : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत; पण त्यांना समाजाच्या ...
चिपळूण : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत; पण त्यांना समाजाच्या पाठीशी उभे न राहता सरकार टिकविण्यासाठी लाचारी पत्करावी लागली आहे. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने एकत्रित या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा फडकवला होता, आपल्याला फक्त दिल्लीपर्यंतच झेंडा न्यायचा आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने येथील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे भाजपची ही यात्रा अनेक कारणांनी आधीपासूनच चर्चेत असताना राणे यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. सकल मराठा समाजातर्फे राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राणे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाज आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून मराठा समाजाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळावे, अशी मागणी आपण सुरुवातीलाच केली. एवढेच नव्हे तर घटनेतील १५ (४) व १६ (४) मधील तरतुदीनुसार मराठा समाजातील आर्थिक शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांचा सर्वेक्षण करण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. त्यानुसार आरक्षण सुरूही झाले होते. मात्र, राज्य सरकार त्यामध्ये खो घालत आहे. आता केंद्र शासनाच्या ३४२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता कायदेशीर कोणतीही अडचण राहिलेली नाही; पण या सरकारला ते करायचे नाही. काहीही झाले तरी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. तेव्हा यापुढे सत्कार बंद करा आणि आपले अधिकार मिळविण्यासाठी ताकद वापरा. त्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहनही राणे यांनी केले.