...इथे भाविक चक्क बगाड्याला लटकतो
By admin | Published: November 23, 2014 12:44 AM2014-11-23T00:44:16+5:302014-11-23T00:44:16+5:30
ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा
अमोल पवार ल्ल आबलोली
गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक चक्क बगाड्याला लटकताना दिसतो आणि तोही अंगात आकडे टोचून. व्याघ्रांबरीवरील श्रध्दाच या श्रध्दाळू भाविकाला यावेळी तारते, असे म्हटले जाते.
बगाडा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी गर्दी करतात. ३५ फूट उंचीच्या आडव्या लाटेवर एका बाजूला नवस करणाऱ्या भक्ताला आकडा टोचून उंचावरुन फिरविली जाते. यावर्षी नऊ भाविकांनी आपले नवस फेडले. यामध्ये भाविकांच्यावतीने प्रमोद नरवणकर, रमेश गुरव, मंगेश नरवणकर, दीपक पाटेकर, विजय जाधव, गणपत नरवणकर, रुपेश नरवणकर, महेश धामणस्कर, मदन नरवणकर यांनी आकडा टोचून नवसांची पूर्तता केली.
आकडा टोचून सुमारे ३५ फूट उंचावर एका बाजूला पाठीला दोन आकडे टोचून भाविक लटकविला जातो. तर दुसऱ्या बाजूने दोरीच्या सहाय्याने फिरविले जाते. त्या भाविकांच्या हातात घंटा असून तो देवीच्या नावाचा जप करतो. विधिवत पूजेनंतर आकडे अडकवून मंदिराला प्रदक्षिणा घालून नंतर नवस फेडला जातो. भाविकांची अलोट गर्दी आणि जत्रा यामुळे देवदीपावलीच्या पूर्वसंध्येला हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.