हाय मास्टची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:31 AM2021-04-01T04:31:50+5:302021-04-01T04:31:50+5:30
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख बंदर असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात लाखोंची उलाढाल दररोज होत असते. मासळीचा ...
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख बंदर असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात लाखोंची उलाढाल दररोज होत असते. मासळीचा साठा मुबलक प्रमाणात सापडल्यास कोटीपर्यंत उलाढाल पोहोचते. मात्र या बंदरात सध्या हाय मास्ट नादुरुस्त झाल्याने मच्छिमारांना अंधारातच वावरावे लागत आहे.
साहित्याची चोरी
देवरुख : संगमेश्वर बसस्थानकाजवळील वेल्डींग वर्क्सच्या दुकानात असलेल्या सुमारे ५१ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहे. सायंकाळी दुकान बंद झाल्यानंतर कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य चोरून नेले आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस स्थानकात या दुकानाचे मालक अली मोईद्दिन फकीर यांनी तक्रार दिली आहे.
बनावट पोस्ट
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जिजामाता जिजाऊ योजनेसंदर्भात पोस्ट टाकली जात होती. मात्र ही पोस्ट बनावट असल्याचा खुलासा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी केला आहे. अशा मेसेजना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही काटकर यांनी केले आहे.
अभिनय कार्यशाळा
दापोली : तालुक्यातील फणसू येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नाट्य अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चित्रपट निर्माता प्रवीणकुमार भारदे यांनी विद्यार्थ्यांना नेपथ्य, दिग्दर्शन, रंगमंच सजावट, वेशभूषा व प्रत्यक्ष अभिनय याविषयी मोफत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला फणसू गावचे अध्यक्ष किशोर सुर्वे, शालेय व्यवस्थापन समितीचे किशोर शिगवण, शाळा समन्वय समिती अध्यक्ष संतोष करंजकर उपस्थित होते.
झाडी वाढल्याने धोका
खेड : तालुक्यातील कोरेगाव संगलट या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूंनी झाडी वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संबंधित खात्याने या मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरोनाबाबत जनजागृती
मंडणगड : होळी उत्सवाच्या निमित्ताने तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एसटी बसस्थानक येथील कर्मचारी, प्रवासी, तहसील कार्यालय, पोलीस कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले. माजी आमदार संजय कदम यांच्याहस्ते हे वितरण करण्यात आले.
वेळेवर खत पुरवठा
रत्नागिरी : अवकाळी पावसाचा तडाखा आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. अशा स्थितीत बळीराजा आता खरिपाच्या तयारीला लागला आहे. या अनुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक खत पुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
संगणक कक्षाचे उद्घाटन
आवाशी : खेड तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी आमदार संजय कदम यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत संगणक संच बसविण्यात आले आहेत. या संगणक कक्षाचे उद्घाटन माजी आमदार कदम यांच्याहस्ते नुकतेच झाले. या संगणक कक्षाचा लाभ पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
शेतकऱ्यांना चिंता
साखरपा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खतनिर्मिती उद्योगात खतांची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे उद्भवलेल्या खत टंचाईमुळे नवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांचा दर वाढण्याची शक्यता आहे. १ एप्रिलपासून खतांचे दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्यात बिबट्याचा वावर
राजापूर : तालुक्यातील भू कोतापूर मार्गावर तेरवण बौद्धवाडी येथे रस्त्यावर बिबट्याचा बछडा सापडला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने वेळेवर बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.