कोकणातील कातळसडे, खाजण, देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:31+5:302021-07-08T04:21:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी किनाऱ्यावरील खाजण वने ...

The highest habitat of butterflies is in Katalsade, Khajan and Devaraya in Konkan | कोकणातील कातळसडे, खाजण, देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास

कोकणातील कातळसडे, खाजण, देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी किनाऱ्यावरील खाजण वने आदींसह कातळसडे आणि देवरायांत वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास आहे, अशी माहिती देवरुख (संगमेश्वर) येथे ‘आपल्या परसदारी फुलपाखरू उद्यान’ ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांनी दिली.

वन विभाग, रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावरील वेबिनार व्याख्यानात मोरे बोलत होते. माेरे म्हणाले की, जागतिक वारसा स्थानांसह २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ उद्याने, अभयारण्ये, आदींचा समावेश राज्यातील जंगलात होत असून, त्यात जागतिक स्तरावर नष्ट होत आलेल्या ३२५ प्रजाती असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणातील कातळसडे आणि खाजणात फुलपाखरांचा अधिक अधिवास असून, कोकणातील आंबोलीनजीकच्या पारपोली गावात २०५पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजातींचे रेकॉर्डस् नोंदविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध फुलपाखरांच्या शरिराविषयी, आयुष्य, प्रजातींविषयी, जीवनपद्धतीविषयी माहिती दिली. सुरुवातीला सर्वांचे स्वागत आणि वेबिनारची भूमिका याबाबत विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी मार्गदर्शन केले. मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांनी आभार मानले.

---------------------------------

पारपोली हे गाव अशी नोंद होणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. हे गाव सन २०१६मध्ये मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब आयोजित बटरफ्लाय फेस्टिव्हलमध्ये फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित झाले आहे.

------------------------

पर्यावरण शिक्षण घडावे, फुलपाखरांचा अधिवास अभ्यासात व्हावा, टुरिझम बहरावे, नेचर ट्रेल्स, संख्यात्मक वाढ, संरक्षण आणि संवर्धन, संशोधन, छंद, आदी कारणांसाठी फुलपाखरू उद्याने तयार व्हायला हवीत, असे मोरे यांनी म्हटले.

Web Title: The highest habitat of butterflies is in Katalsade, Khajan and Devaraya in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.