रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरातील उच्चांकी ४१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:32 AM2021-04-16T04:32:09+5:302021-04-16T04:32:09+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी आलेल्या अहवालात रुग्णांच्या संख्येचा विस्फाेट झाला. गुरुवारी तब्बल ४१७ ...
रत्नागिरी : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी आलेल्या अहवालात रुग्णांच्या संख्येचा विस्फाेट झाला. गुरुवारी तब्बल ४१७ रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या वर्षभरातील सर्वाधिक ठरला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,०३८ झाली आहे, तर ६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, मृतांची संख्या ४२१ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा चिंताग्रस्त झाली आहे. गेल्या पंधरवड्यामध्ये ३००९ रुग्ण वाढल्याने संपूर्ण प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. रत्नागिरी तालुका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे केंद्रबिंदू ठरले असून दिवसभरात १५९ रुग्ण आढळले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर संगमेश्वर तालुका असून, १२१ रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण वर्षभरातील संगमेश्वर तालुक्यातील उच्चांकी संख्या आहे. त्याचबरोबर दापोली तालुक्यात ३७ रुग्ण, खेडमध्ये १४, गुहागरात २९, चिपळुणात १९, मंडणगडमध्ये २२, लांजात १६ आणि राजापुरात १० रुग्ण आढळले.
मृतांमध्ये महिला, पुरुष रुग्णांची संख्या प्रत्येकी ३ असून, एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दापोली तालुक्यात २ रुग्ण आणि लांजा, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन रुग्ण ४५ वर्षांचे तरुण आहेत. उर्वरित ४ रुग्ण साठी पार केलेले आहेत. मृतांचे प्रमाण २.९९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९३ टक्के आहे.