सप्टेंबर महिन्यातील सर्वात उच्चांकी पाऊस
By admin | Published: September 7, 2014 12:31 AM2014-09-07T00:31:11+5:302014-09-07T00:34:25+5:30
संततधार सकाळपर्यंत कायम
रत्नागिरी : जिल्ह्यात काल (शुक्रवार) पासून पावसाने धरलेली संततधार सकाळपर्यंत कायम होती. गेल्या २४ तासात मुसळधार पडलेल्या या पावसाने आजवरच्या सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एकूण १०२२.८५ मिमी पाऊस (सरासरी ११३.६५ मिलीमीटर)ची नोंद करत उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात (१७२.८५ मिलीमीटर ) झाली आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले. या पावसाने राजापूर, रत्नागिरी आणि मंडणगड वगळता उर्वरित दापोली, त्याखालोखाल खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा तालुक्यांना झोडपले आहे. या तालुक्यांमध्ये ११ सेंटीमीटर्सपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकाच दिवशी एवढा उच्चांकी पाऊस आजवर झालेला नाही. या पावसामुळे राजापूरसह काही तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्याने नुकसान झाले आहे. गतवर्षी याचदिवशी जिल्ह्यात ११ मिलीमीटर सरासरीने पडल्याची जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंद आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात झालेला १११ मिलीमीटर पाऊस म्हणजे गतवर्षीच्या तुलनेने दहापट झाला आहे. अजूनही पाऊस जोरदार पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळ पासून पुढील ७२ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटिमीटर्सपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. (प्रतिनिधी)