वाशिष्ठी पुलाच्या काँक्रिटीकरणासाठी तासभर महामार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:54+5:302021-06-09T04:39:54+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलासाठी काँक्रीटच्या कामासाठी मंगळवारी ...
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलासाठी काँक्रीटच्या कामासाठी मंगळवारी जुन्या वाशिष्ठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दोन तासांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन केले होते. मात्र, तासाभरात काँक्रीटचे काम झाल्यानंतर पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
गेल्या तीन-चार वर्षांपासून वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामात नियमित गती
न राहिल्याने पुलावरील वाहतूक सुरू झालेली नाही. ठेकेदार कंपनी तसेच खासदार विनायक राऊत यांनी १५ जूनपूर्वी वाशिष्ठी पुलावरील वाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पुलाची विविध कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. त्यामुळे या पुलावरील वाहतूक आणखी काही महिने रखडणार आहे. दरम्यान, पुलाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वाशिष्ठी पुलावरील वाहतूक दोन तास बंद ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी कंपनीने महसूल, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची मान्यता घेतली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चिपळूणहून मुंबईकडे जाणारी वाहने गुहागर बायपास मार्गे वळवली होती. पुलावरील काँक्रिटीकरणाचे काम तासाभरात संपल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, पुलावरील वाहतूक बंद राहिल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
--------------------
महामार्गावर चार टीम तैनात
दरम्यान, ठेकेदार चेतक कंपनीकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर चार टीम तैनात केल्या आहेत. महामार्गावर पाणी तुंबल्यास, झाडे पडल्यास त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी आणि कटर मशीन तयार ठेवले आहे. परशुराम, कळंबस्ते, कापसाळ आणि सावर्डे या ठिकाणी या टीम कार्यरत ठेवल्या आहेत. पावसाळ्यात महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यात अडचणी येणार नसल्याचा विश्वास कंपनीकडून देण्यात आला.