चाकरमान्यांच्या आगमनाने महामार्ग फुल्ल; बाजारपेठेतही उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:55+5:302021-09-09T04:38:55+5:30
चिपळूण : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन आता जोरात सुरू झाले आहे. एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी चाकरमानी कोकणात दाखल ...
चिपळूण : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन आता जोरात सुरू झाले आहे. एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी चाकरमानी कोकणात दाखल होत असून, मुंबई गोवा महामार्ग अक्षरश: फुल्ल झाला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अर्थात, वाढलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासाचा त्रास आणि प्रवासाचे तास वाढले आहेत. गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबगही सुरू झाली असून, बाजारपेठेत चांगलीच गर्दी उसळली आहे. त्यामुळे व्यापारी खूश दिसत आहेत.
कोकणातील सर्वात लाडका व महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शुक्रवारपासून या उत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, पुढील ५ दिवस गणेशोत्सव प्रत्येक गावात, वाडीत आणि घरात रंगणार आहे. त्यामुळे कोकणात प्रचंड उत्साहाचे वातावरण आतापासूनच दिसून येत आहे. गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावागावात येणारे चाकरमानी होय. लाखोंच्या संख्येने मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून चाकरमानी आपल्या गावी या सणासाठी येतात. आता उत्सव काही दिवसावर येऊन ठेपल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दुपटीने वाढली आहे.
जादा एसटी बसेस, तसेच खासगी बसेस आणि खासगी गाड्यांमधून चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाल्याने, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा दिसून येत आहेत. चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण होऊन रस्ते खुले झाले असले, तरी सुरू असलेले काम त्यासाठी बायपास केलेले रस्ते आणि जुन्या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे, तसेच अविरत पडणारा पाऊस, यामुळे मात्र वाहतुकीला काही ठिकाणी प्रचंड अडचण निर्माण होऊन खोळंबा होत आहे. प्रवासाला दोन ते तीन तास अधिक जात असल्याचे चाकरमान्यांचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना चाचणी व अन्य तपासण्याचा निकष कमी झाल्याने चाकरमानी समाधानही व्यक्त करत आहेत.
..................
बाजारपेठेत ही खरेदीसाठी गर्दी
गणेशोत्सवासाठी आता खरेदीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. चिपळूण बाजारपेठेत तर सकाळपासूनच खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. महापुरानंतर चिपळूण बाजारपेठ पुन्हा उभी राहिली असून, गणेशोत्सवासाठी दुकानेही सजली आहेत. ग्राहकांची गर्दी पाहता, व्यापारीही आनंदित झाले आहेत. पुढील काही दिवस खरेदीसाठी असाच उत्साह राहिला, तर येथील व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळणार आहे.