अपघातानंतर कामथेच्या संतप्त ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:49+5:302021-03-21T04:29:49+5:30
मुंबई - गाेवा महामार्गावरील कामथे येथे झालेल्या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग राेखून धरला हाेता. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प ...
मुंबई - गाेवा महामार्गावरील कामथे येथे झालेल्या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग राेखून धरला हाेता. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चारचाकी गाडीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे घडली. यामध्ये विराज विश्वास कांबळी (२०, रा. कामथे-डिकेवाडी) या तरुणाला दुखापत झाल्याने संतप्त झालेल्या कामथे येथील ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. अखेर आमदार शेखर निकम व पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको मागे घेण्यात आला.
विराज विश्वास कांबळी नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी खेर्डी औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामासाठी सायकलने निघाला होता. अशातच कामथे-डिकेवाडी येथे महामार्ग ओलांडल्यानंतर गोव्याच्या दिशेने आलेल्या व्हॅगणार गाडीची धडक बसली. यामध्ये तरुणाच्या हातापायाला दुखापत झाली. त्यामुळे घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. यावेळी कामथे-डिकेवाडी, माटेवाडी व फणसवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करत कामथे येथे भुयारी मार्ग व गतिरोधकाची जोरदार मागणी केली.
ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. याबाबतची माहिती पाेलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व सहकारी घटनास्थळी पोहोचले; मात्र ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच ग्रामस्थांची समजूत काढली आणि भुयारी मार्गाविषयी तातडीची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले, तसेच संबंधित चारचाकी चालकाने जखमी तरुणाच्या दुखापतीची भरपाई देण्याचे मान्य करताच रास्ता रोको मागे घेण्यात आला. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चौकट
सलग तिसरा अपघात
महामार्गावर कामथे-डिकेवाडी येथे सलग तिसरा अपघात असून, महिना भरापूर्वी येथे एका पादचारी वृद्धाला चारचाकी वाहनाची धडक बसून जागीच मृत्यू झाला हाेता, तर अन्य एक दुचाकीस्वार जखमी झाला होता. त्यानंतर सलग तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग राेखून धरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले हाेते; मात्र सामंजस्याने यावर ताेडगा काढल्याने ग्रामस्थ शांत झाले.
चाैकट
भुयारी मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष
मुंबई - गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील कामथे येथे नेहमीच वर्दळ असते, तसेच याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असल्याने गर्दी सुरू असते. त्यामुळे याठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी रस्ता ओलांडताना नागरिकांना त्रास हाेत आहे. त्यामुळे भुयारी मार्ग गरजेचा आहे.