‘हिम्बज हॉलिडेज’कडून करोडोंचा अपहार
By admin | Published: March 2, 2015 11:13 PM2015-03-02T23:13:43+5:302015-03-03T00:32:27+5:30
शेकडोंची तक्रार : अटकेतील आरोपींमध्ये रत्नागिरीतील तिघांचा समावेश
रत्नागिरी : हिम्बज हॉलिडेज प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी खेडशी (ता. रत्नागिरी) येथील प्रमिला कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय उघडून शेकडो नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर या कंपनीविरोधात फसवणूक झालेले काही गुंतवणूकदार तक्रारींसाठी पुढे येत आहेत. याबाबत नागरिकांनी पुराव्यासह तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. सॅफरॉननंतर हे प्रकरणही गाजण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना आधीच अटक केली असून, त्यात रत्नागिरी परिसरातील तिघांचा समावेश आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.१८/२०१५ नुसार याप्रकरणी भारतीय दंडविधान ४०६, ४२०, ३४ अन्वये हिम्बजविरोधात ६ जुलै २०११ ते आॅगस्ट २०१३ या कालावधीत प्रमिला कॉम्प्लेक्स, खेडशी येथे घडलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबतचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी हिम्बज हॉलिडेज प्रा. लि. यांनी प्रमिला कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे कार्यालय सुरू करून नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांना अधिक व्याजाचे व सहलीच्या योजनांचे आमिष दाखवण्यात आले. लोकांकडून पैसे स्विकारून कंपनीने त्या पैशांचा अपहार केल्याचे पुढे आले आहे.
त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतवून ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी केलेल्या मूळ गुंतवणुकीच्या पुराव्यासह (पावत्या, धनादेश, इतर कागदपत्र) पोलिसांना माहिती देऊन गुुन्हे दाखल करावेत. तसेच या कंपनीबाबत कोणाला काही इतर माहिती असल्यास अगर सांगावयाचे असल्यास त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यालयीन वेळेत हजर राहून माहिती द्यावी, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. यादव यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)