हिंदी शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज : जोशी
By Admin | Published: December 15, 2014 08:59 PM2014-12-15T20:59:54+5:302014-12-16T00:20:39+5:30
महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.
चिपळूण : राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या हिंदी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात राज्य शासनाकडून वारंवार बदल करून समस्या निर्माण केल्या जात आहेत. त्याच्या निवारणार्थ सर्व हिंदी शिक्षक, हिंदी प्राध्यापक, हिंदीप्रेमी साहित्यिक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने त्रिभाषा सुत्रांचा स्वीकार केला आहे. मराठी प्रथम भाषा ६ तासिका, हिंदी द्वितीय भाषा ४ तासिका, इंग्रजी तृतीय भाषा ८ तासिका आहेत. मराठी १०० अंक, हिंदी द्वितीय भाषा १०० अंक, इंग्रजी तृतीय भाषा १०० अंक, समान भाषा, समान अंक, समान तासिका अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊन १ लाख सह्यांचे अभियान, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद अध्यक्षांची पत्र व प्रस्ताव, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे संचालक प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांना पाठविली आहेत.राज्य शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरु केला आहे. या भाषेला ८ तासिका परंतु, हिंदी द्वितीय भाषा केवळ चार तासिका, महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.
ते म्हणाले, दहावीसाठी राज्य शासनाने व्यवसायाभिमुख शिक्षण, शालेय अभ्यासक्रमात नवीन विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेऐवजी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही भाषा विषयांवर अन्याय नको. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा. अकरावी, बारावी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषय कायम ठेवण्याचे धोरण राज्य शासन अमलात आणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे हिंदी द्वितीय भाषेवर अन्याय होत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून, त्या भाषेचा व या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी सन्मान वाढविण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याची वृत्ती योग्य नसून सर्वांनी एकत्र यावे. (प्रतिनिधी)