हिंदुत्त्वामुळे भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे नेईल : भैयाजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:07 PM2019-01-21T17:07:17+5:302019-01-21T17:09:16+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.
चिपळूण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ते सांप्रदायिक नाही. ते दुर्बलांना सबल करते. ते सर्वांना दृष्टी देणारे आहे. या हिंदुत्त्वामुळेच भारत अख्ख्या विश्वाला ध्येयाकडे घेऊन जाणारे नेतृत्त्व करेल, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले.
कै. पुरूषोत्तम नीलकंठ तथा अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचे अमृत या पुस्तकाच्या दितीय आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
येथील दातार, बेहरे, जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. विनय नातू, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर भिडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष मंगेश तांबे, प्रकाश देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिंदू संभ्रमित होता, अशा काळात ज्यांनी विश्वासाने हिंदुत्त्वासाठी काम केले, अशा पिढीतील कै. अप्पा साठे होते. त्यामुळे त्यांनी मांडलेले अनुभव प्रेरक आहेत, असे भैयाजी जोशी यांनी सांगितले. संघाचे हिंदुत्त्व संकुचित नाही. ज्यांचा एकच ग्रंथ आहे, ते संकुचित आहेत. हिंदूंमध्ये जो पूजा करतो तोही हिंदू आणि पूजा करत नाही, तोही हिंदूच. सत्य, सहकार, समन्वय आणि चारित्र्य ही जीवनमूल्ये घेऊन हिंदुत्त्व पुढे जाते, असेही ते म्हणाले.
श्रीधर भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष खेराडे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर भैयाजी जोशी आणि अन्य मान्यवरांहस्ते पुस्तक प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुस्तकाचे समीक्षणच मांडले. कोकणी माणूस रसिक आणि कलावंत आहे. त्याला नाट्य, साहित्य, लेखन यात रूची आहे. त्यामुळेच या पुस्तकातून समकालीन परिस्थिती सर्वांसमोर येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आपले वडील कै. अप्पासाहेब साठे यांचे चिपळूणवर अधिक प्रेम असल्याने त्यांच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन कार्यक्रम चिपळुणात होत असल्याचे चिपळूणची माहेरवाशीण आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. संघाने संस्कार केल्यावर व्यक्तिमत्त्व कसे घडते, हे सर्वांसमोर यावे, यासाठी द्वितीय आवृत्ती प्रकाशनाचा घाट घालण्यात आल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
समयोचित भाषण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. कुठे, काय आणि किती बोलायचे हे ज्याला नेमके कळते असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले. ज्याला बोलायचे कळते, त्याला वागायचे कसे हेही चांगले कळते. त्यामुळे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य असल्याचेही त्या म्हणाल्या.