लाॅकडाऊनच्या काळात त्याची कला बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:45+5:302021-09-24T04:37:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाकाळात जागतिक स्तरावर अर्थचक्र थांबले होते. मात्र, या काळात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. पानवल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाकाळात जागतिक स्तरावर अर्थचक्र थांबले होते. मात्र, या काळात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. पानवल आपकरेवाडीतील केतन बाबल्या आपकरे या युवकाने लाॅकडाऊनच्या काळात घरातील वेळ रिकामा न घालवता तो सत्कारणी लावला. वेगवेेगळ्या झाडांच्या पानावर कोरून त्यापासून त्याने महामानव, देवता, पशुपक्षी, व्यक्ती अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या कलेला आता सर्वदूर प्रसिद्धीही मिळू लागली.
लहानपणापासून केतनला चित्रकलेची आवड होतीच. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाल्याने शैक्षणिक संस्थाही बंद होत्या. याच काळात म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यात काहीतरी करण्याच्या शोधात असताना केतनला इन्स्ट्राग्रामवर पानावर भगवान शंकराचे कोरलेले चित्र दिसले. त्याने मेहनत घेऊन तसे चित्र पानांवर कोरण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.
त्यानंतर दोन-तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर साधारणत: जानेवारीच्या सुमारास केतनने आपल्या या नव्या कलेला पुन्हा सुरुवात केली. वड, फणस, आंबा, पिंपळ या झाडांच्या पानांवर कोरून त्याने तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रखुमाई, बाळासाहेब ठाकरे, भगवान शंकर, गणपती, महेंद्रसिंग धोनी, व्यक्तींचे फोटो तसेच प्राणी, पक्षी अशा अनेक कलाकृती साकारल्या. एवढंच नव्हे तर नाव किंवा एखादा फोटो अगदी हुबेहूब रेखाटण्याची कला त्याने आत्मसात केली.
लॉकडाऊन दुसऱ्या टप्प्यात त्याने पूर्ण वेळ झाडांच्या पानावर महापुरुषांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला डिटेलिन कोरीव काम करताना दाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेडच्या साहाय्याने कोरीव काम केले. त्यानंतर त्याने या कोरीव कलेविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक माहिती गोळा केली. यातून त्याला 'पेन नाईट' ब्लेड वापरले जाते, असे समजले. आता तो पेन नाईट ब्लेडच्या साहाय्याने पानांवर विशेषत: पिंपळाच्या पानावर कोरून उत्कृष्ट कलाकृती साकारत आहे. गेल्या आठ - नऊ महिन्यांत त्याने सुमारे ४० कलाकृती विविध पानांवर साकारल्या आहेत. त्याने आता इन्स्ट्राग्रामवर स्वत:चे पेजही सुरू केल्याने त्याची कला आता सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे गुजरात, चेन्नई, तमिळनाडू आदी राज्यांमधून त्याच्या या कलेला मागणी होऊ लागली आहे.
...............
केतनचे वडील गवंडी काम करतात. स्वत: कष्ट करून त्यांनी मोठ्या मुलीला शिक्षण देऊन टेलरिंगचा कोर्सही दिला. त्यामुळे तो पूर्ण करून ती आता टेलरिंग व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभी आहे, तर केतन याने बारावीनंतर आयटीआयचा सिव्हिल ड्राफ्टसमन हा अभ्यासक्रम हल्लीच पूर्ण केला आहे. त्यात तो उत्तीर्णही झाला आहे. सध्या तो नोकरीच्या शोधात आहे.
............
मला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. मात्र, लाॅकडाऊनच्या काळात मी पानावर कोरून कलाकृती काढण्यास सुरुवात केली. या कलाकृतींना इतर राज्यांतूनही मागणी होत आहे. मात्र, नोकरी मिळाल्यानंतरही तो आपल्या या कलेला वेळ देणार आहे. माझ्या घरातून सर्वांचेच या छंदाला प्राेत्साहन मिळत आहे.
- केतन आपकरे, कलाकार.