इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:31 PM2019-06-04T13:31:28+5:302019-06-04T13:32:33+5:30
कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.
राजापूर : कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.
इतिहासकालीन राजापूर शहराची ओळख सांगणारे महत्वाचे स्थान म्हणजे गंगाकुंड. मागील अनेक वर्षे दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा अवतीर्ण होते. त्यानंतर काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा तिचा प्रघात राहिला आहे.
मात्र, अलिकडच्या काही वर्षात गंगेचे आगमन व निर्गमन या प्रथेमध्ये बदल झाला असून, आता तर तिचे तीन वर्षांपूर्वीच आगमन व दीर्घकालानंतर निर्गमन असा क्रम सुरु आहे. यापूर्वी तर सलग दोन वर्षे गंगेचे आगमन झाले आहे.
साधारणपणे नोव्हेंबर ते मे असा गंगेचा आगमन कालावधी राहिला आहे. जूनमध्येदेखील तिचे आगमन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना त्यावेळी डोंगरांनी वेढलेल्या भागात एकाचवेळी १४ कुंडात पाणी उपलब्ध होते व त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊनदेखील पाण्याचे प्रमाण जसेच्या तसे राहात असल्याचे पाहायला मिळते.
गंगाक्षेत्री काशीकुंडातील पाणी देण्यासाठी गंगापुत्र उपस्थित असतात. मात्र, तशी व्यवस्था अन्य कुंडात नसल्याने अनेकवेळा स्नानासाठी आलेले भाविक कुंडात उतरुन स्वत:च स्नान करतात. शिवाय इतरांनाही पाणी काढून देतात. पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊनही या कुंडातील पाण्याच्या पातळीत घट झालेली नाही.
बारमाही उष्ण झरा
राजापूर शहरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गंगाक्षेत्र आहे. त्यालगतच बारमाही वाहणारे उष्ण पाण्याचे झरे म्हणजेच उन्हाळे हा भाग येतो. गंगाक्षेत्रावर येणारे भाविक प्रथम उन्हाळे येथे जावून गरम पाण्यात स्नानाचा लाभ घेतात. या पाण्यातही गंधकाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. याठिकाणी आंघोळ करून भाविक गंगाक्षेत्रावर येतात.