Ratnagiri: गोविंदगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, ८० हून अधिक तोफगोळे सापडले
By संदीप बांद्रे | Published: July 2, 2024 12:17 PM2024-07-02T12:17:33+5:302024-07-02T12:18:01+5:30
चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना ८० हून अधिक तोफगोळे सापडले. या तरुणांनी हा ...
चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना ८० हून अधिक तोफगोळे सापडले. या तरुणांनी हा ऐतिहासिक ठेवा गड किल्ले संरक्षण करणाऱ्या राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या ताब्यात दिले आहे.
गोवळकोट येथील तरुण शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गडावरती फेरफटका मारत असताना त्यांना सुरवातीला तोफेचे २ गोळे दिसून आले. तेथील माती बाजुला केली असता त्यांना अजूनही काही तोफांचे गोळे आढळून आले. त्यांनी लगेचच राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोटचे अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला असता ते लगेचच गडावर आले आणि त्यांनी उपस्थित मुलांना योग्य त्या सूचना देऊन एक एक गोळा बाहेर काढण्याचे काम सुरू केले. बघता बघता मुलांना सुमारे ८० पेक्षा जास्त तोफगोळे बाहेर काढण्यात यश आले. सदरचे गोळे हे दगडी तोफगोळे आहेत.
शहरातील गोवळकोट येथील राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १० वर्ष संवर्धनाचे काम चालू असताना या आधी चार ते पाच गोळे मिळाले होते गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा पहाता गडावर गोळे मिळतील. याचा अंदाज होताच पण गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे, सौरभ टाकळे, गणेश बुरटे, प्रथमेश शिंदे, सोहम हरवडे, आशुतोष राऊत उपस्थित होते.