चिपळुणात उलगडणार स्वातंत्र्यवीरांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:57+5:302021-09-27T04:33:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती ...

The history of freedom fighters will unfold in Chiplun | चिपळुणात उलगडणार स्वातंत्र्यवीरांचा इतिहास

चिपळुणात उलगडणार स्वातंत्र्यवीरांचा इतिहास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. हा संपूर्ण इतिहास भावी पिढीला कळावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मार्गताम्हाने विद्यालय भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीरांचा इतिहास उलगडणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हा उपक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, आज भावी पिढीला इतिहासाची ओळखच नसल्याने त्यांच्या मनात देशभक्तिपर बीजे पेरण्याची खऱ्या अर्थाने गरज भासू लागली आहे. इतिहासावर आधारित या कार्यक्रमातून त्यांना इतिहासाची ओळख करून दिल्यास त्यांच्या मनावर इतिहास बिंबवला जाईल. यामध्ये १ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाची रूपरेषा, २ रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीराचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर ‘स्वातंत्र्य आंदोलनातील अभिनव भारत संघटनेचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानानंतर खऱ्या अर्थाने या कार्यकमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी निबंध व एकपात्री अभिनव स्पर्धा, यासह विविध स्पर्धा, व्याख्यान, परिसंवाद, तसेच स्वतंत्र भारताचे संरक्षण करणारे माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचे संमेलन, शोभायात्रा, चित्ररथ, असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांचे व्याख्यान हाेणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांचा इतिहास व त्यांचे योगदान याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमांची सांगता होणार असून, या दिनी ध्वजारोहणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तिरंगा ध्वज दिला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जयसिंग मोरे, सचिव मोहन चव्हाण, सहसचिव अजित साळवी, खजिनदार मनोहर चव्हाण, सदस्य शशिकांत चव्हाण, कृष्णा चव्हाण, प्राचार्य विजयकुमार खोत, मुख्याध्यापक संदीप गोखले, प्रा. राजश्री कदम आदींची उपस्थिती होती.

Web Title: The history of freedom fighters will unfold in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.