इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:55 PM2022-10-13T13:55:57+5:302022-10-13T13:56:14+5:30
नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या या संशोधनाचा हजारो अभ्यासकांना उपयोग झाला आहे आणि यापुढेही होत राहणार आहे.
चिपळूण/दापोली : इतिहासाचे नामवंत अभ्यासक आणि संशोधक, सामाजिक क्षेत्रात थोर कार्य केलेले अनंत उर्फ अण्णा शिरगावकर यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने अपरांत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
अण्णांचा जन्म ५ सप्टेंबर १९३० रोजी गुहागर तालुक्यातील विसापूर येथे झाला. त्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळ येथे राहून सर्वाधिक कार्य केले. अण्णा जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. दाभोळ येथे मच्छीमार आणि भोई समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सागरपुत्र विद्यार्थी वसतिगृह सुरू केले होते. नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी याचा मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या या संशोधनाचा हजारो अभ्यासकांना उपयोग झाला आहे आणि यापुढेही होत राहणार आहे.
अखेरच्या दिवसात एकांतातच राहण्याचा त्यांचा मानस असल्याने अलीकडे काही दिवस ते चिपळूण तालुक्यातील मालघर येथे राहत होते. मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री अपरांत हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची देहदानाची इच्छा मंगळवारी पूर्ण करण्यात आली.
संशोधन क्षेत्रात थोर कार्य करणाऱ्या अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, १६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘लोटिस्मा’च्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’चे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.
अण्णांच्या शब्दात
- तसं पाहिलं तर ‘सब भूमी मेरी कर्मभूमी’ असं मला म्हणता येईल. संस्कृत भाषेतील ‘अपरान्त’ ह्या शब्दाचा अर्थ पश्चिम टोकाला असलेला भू-प्रदेश! ‘अपरान्त’ हे प्राचीन कोकणचे नाव आहे.
- सुरतेपासून कारवारपर्यंत पसरलेल्या अणि लाखो वर्षांपूर्वीच्या प्रलयंकारी भूकंपात समुद्रातून वर आलेल्या या भूमीचे पुनर्वसन आणि समृद्धी भगवान परशुरामांनी घडवून आणली. म्हणून ही परशुराम भूमी!
- अशा ह्या कोकणाला प्राचीन इतिहास आहे. मला त्याचे फार औत्सुक्य! गेली ४०-५० वर्षे त्याचा शोध घेण्याचा माझ्या अल्प कुवतीप्रमाणे प्रयत्न केला.
- माझ्या आयुष्यभराच्या या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या.
- अनेक विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोधनिबंध लिहिले. या सर्वांतून माझ्या संशोधनावर प्रकाश पडला, याचे मला समाधान आहे.