देयकांसाठी ठेकेदारांची बांधकाम खात्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:34+5:302021-04-01T04:32:34+5:30
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत असलेली देयके मिळवण्यासाठी येथील ठेकेदारांनी बुधवारी चिपळुणातील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. शासनाकडून ...
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत असलेली देयके मिळवण्यासाठी येथील ठेकेदारांनी बुधवारी चिपळुणातील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. शासनाकडून देयक आल्यानंतर तातडीने त्याचे वितरण केले जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर ठेकेदार माघारी परतले.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध हेडअंतर्गत शासनाकडून २४ कोटी रुपये येणे बाकी आहे.
दरवर्षी मार्चअखेर ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले त्यांना मिळतात. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काम झाले असले तरी पैसे मार्चअखेरीला मिळतात. मात्र ठेकेदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले त्यांना अजूनही मिळालेली नाही. मार्च महिना संपला तरी देयके कधी मिळतील याबाबत शासनाकडून सूचना नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ठेकेदारांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळ्ये यांची भेट घेतली. आम्ही केलेल्या कामाचे पैसे कधी लवकर मिळणार अशी विचारणा ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता यांना केली. तेव्हा शासनाकडून अद्याप निधी आलेला नाही. निधी आल्यानंतर तातडीने त्याचे वितरण केले जाईल, असे आश्वासन मुळ्ये यांनी दिले. शासनाकडून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता यांना केली.
..........................
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र निधीबाबत अडचणी आहेत. तरीही ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. ठेकेदारांना त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत.
- उत्तमकुमार मुळ्ये, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण