घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:52 PM2020-11-04T18:52:13+5:302020-11-04T18:53:45+5:30
Crimenews, police, ratnagirinews खेडशी नॅनो सिटी येथे बंद फ्लॅट फोडून २ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा गुन्हा २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
रत्नागिरी : खेडशी नॅनो सिटी येथे बंद फ्लॅट फोडून २ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा गुन्हा २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
घरफोडीची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. या तपासात दिनांक ३ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी नीलेश विजय मोहीत (२९, नॅनोसिटी, खेडशी, रत्नागिरी) या संशयितास रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या बॅगेतून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे दोन हार, सोन्याची अंगठी, कर्णफुले असा चोरीला गेलेला २ लाख २७ हजार रुपयांचा सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाकडून सुरू आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, हेडकॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, राकेश बागुल, आशिष शेलार, पोलीस विजय आंबेकर, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी चोख कामगिरी बजावली.
२१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२० दरम्यान खेडशी, गयाळवाडी, कापडी इन्क्लेव्ह येथे बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. त्याचाही तपास केला जात आहे.