घरेलू कामगारांचा आझाद मैदानात ठिय्या

By admin | Published: March 18, 2015 10:09 PM2015-03-18T22:09:39+5:302015-03-18T23:59:48+5:30

प्रलंबित मागण्या : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला एकवटल्या

Home workers sit at Azad Maidan | घरेलू कामगारांचा आझाद मैदानात ठिय्या

घरेलू कामगारांचा आझाद मैदानात ठिय्या

Next

मार्लेश्वर : राज्यातील घरेलू कामगारांचे प्रश्न अद्यापही सोडवले न गेल्यामुळे अखेर संपूर्ण राज्यातील घरेलू कामगारांनी मुुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन छेडले. मुंबईतील आमदार संजय दळवी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन घरेलू कामगारांचे प्रश्न विधान भवनात मांडून त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.गेल्या अनेक महिन्यांपासून घरेलू कामगारांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. यावर चर्चा होऊन आश्वासनेही देण्यात आली. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे, आता या कामगार संघटीत होत आहेत. राज्यामध्ये घरेलू कामगार मोठ्या संख्येने आहेत. २०१० साली राज्यात महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा अस्तीत्वात आला. घराघरात जाऊन धुणी-भांडी, साफसफाई, स्वयंपाक, लहान मुले व आजारी माणसांची देखभाल करणाऱ्या म्हणजेच सामाजिक श्रम करणाऱ्या कष्टकरी महिलांना सन्मानाने जगण्याकरिता हा कायदा मदतनीस ठरेल, अशी रास्त अपेक्षा निर्माण झाली.
२०११ साली प्रत्यक्ष घरेलू कामगारांचे कल्याण मंडळ अस्तित्वात आले. गेल्या ३ वर्षात सुमारे २ लाखाहुन अधिक घरेलू कामगार या घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृ त झाले. त्यांना जनश्री विमा योजना लाभ, प्रसुती लाभ, ५५ वर्षावरील नोंदणीकृत घरेलू कामगारांना १० हजार रूपये सन्मान धन इतर लाभ दिले. मात्र, अजूनही घरेलू कामगारांचे अनेक प्रश्न व मागण्या आहेत.
यामध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यात यावे, जिल्हावार घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, घरेलू कामगारांना किमान वेतन, पेन्शन, कामगार विमा योजना, सन्मानधन, साप्ताहिक रजा लागू करण्यात यावी, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या घरकामगारांच्या सन्मानजनक रोजगाराकरिता सनद १८९ प्रमाणे कायदा तयार करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, घरेलू कामगारांसहित सर्वच कष्टकऱ्यांना रेशनिंगद्वारा अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा, या मागण्याचा समावेश आहे.
या मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील घरेलू कामगारांनी एकत्र येऊन आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन छेडले व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालय प्रमुख कॉ. संपत देसाई व महाराष्ट्र घरेलू कामगार युनियनचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक दत्ताराम लिंगायत यांनी घरेलू कामगारांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

राज्यातील सर्व घरेलू कामगारांनी एकत्र येऊन छेडले आंदोलन.
कामगार कल्याण मंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, कामगारांना किमान वेतन, पेन्शन, विमा योजना, साप्ताहिक रजा लागू करण्यात यावी, यासह अनेक मागण्या प्रलंबित.

Web Title: Home workers sit at Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.